Tuesday, November 17, 2026
HomeनगरRahata : गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मिळणार रब्बी व उन्हाळी प्रत्येकी एक आवर्तन

Rahata : गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मिळणार रब्बी व उन्हाळी प्रत्येकी एक आवर्तन

पाण्याचा थेंब अन् थेंब जपून वापरा, उधळपट्टी थांबवा || कालवा सल्लागार बैठकीत पालकमंत्री विखे पाटील यांचे आवाहन

राहाता |प्रतिनिधी| Rahata

चालू वर्षी पर्जन्यमानामध्ये तब्बल 50 टक्क्यांपेक्षा जास्त तूट असल्याने भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी धरण समूहातील उपलब्ध पाणीसाठ्याचे चोख नियोजन करून, लाभक्षेत्रासाठी रब्बी आणि उन्हाळी हंगामाकरिता प्रत्येकी एक आवर्तन देण्याचे महत्वपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. टंचाईच्या या कठीण काळात पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा लागणार असून, शेतकरी बांधवांनी उधळपट्टी थांबवून जलसंपदा विभागाला सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

- Advertisement -

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत आयोजित कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत धरणातील उपलब्ध पाणीसाठा, आवर्तनांचे नियोजन आणि कालव्यांच्या दुरुस्तीबाबत सविस्तर चर्चा झाली. परिस्थितीचे गांभीर्य मांडताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील वर्षी याच काळात 516 मि.मी. पाऊस झाला होता, तर यंदा अवघ्या 261 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अल निनोच्या आव्हानात्मक वातावरणातही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लोचे पाणी सुरुवातीला लाभक्षेत्राला देता आले. तसेच मागील दोन वर्षांत जायकवाडी धरणासाठी पाणी सोडावे न लागणे ही दिलासादायक बाब ठरली.

राज्यातील इतर जिल्ह्यांत भीषण सूचनांवर सरकार संकट असून अनेक महापालिका-नगरपालिकांना पाणीकपात करावी लागली आहे. अशाही स्थितीत गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी रब्बी व उन्हाळी अशा दोन आवर्तनांची ग्वाही त्यांनी दिली.नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा अत्यंत घातक असून त्यामुळे शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी येत असल्याचे सांगत मंत्री महोदयांनी सर्व कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्याची धडक मोहीम हाती घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच, संपूर्ण कालव्यांचे अस्तरीकरण होणार हा गैरसमज असून केवळ तांत्रिक दृष्ट्या आवश्यक असलेल्या बांधकामांच्या ठिकाणीच अस्तरीकरण केले जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. नाबार्डच्या विशेष निधीतून कालव्यांच्या नूतनीकरणाची प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. शेतकर्‍यांनी आपली चालू पाणीपट्टी वेळेत भरावी, सरकार याबाबत संवेदनशील आहे; मात्र नगरपालिकांकडील थकबाकीबाबत जलसंपदा विभागाने कायदेशीर पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीच्या प्रारंभी अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांनी अचूक आकडेवारीसह पाणी नियोजनाचे सादरीकरण केले.

या बैठकीस आमदार आशुतोष काळे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, राहात्याचे उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, मोहनराव सदाफळ, नारायण कार्ले, हेमंत बोरावके, डॉ. के. वाय. गाडेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि उपविभागीय अभियंता विवेक लव्हाट उपस्थित होते. बैठकीत आमदार आशुतोष काळे, आमदार हेमंत ओगले व स्नेहलता कोल्हे यांनी विविध मागण्या मांडल्या, तर नपावाडीचे विजय वहाडणे, विलास कदम, संपतराव भारुड, विजय सदाफळ आणि संजय काळे आदी शेतकर्‍यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : थोरात, काळे, मुळा, ज्ञानेश्वर, अशोक आणि अगस्तीसह ढाकणेंकडून पहिली...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला असून, आतापर्यंत सुमारे 30 लाख 20 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप...