Friday, May 3, 2024
Homeनगरगोदावरीच्या कालवा सल्लागार समिती बैठकीचा चेंडू आमदारांच्या कोर्टात!

गोदावरीच्या कालवा सल्लागार समिती बैठकीचा चेंडू आमदारांच्या कोर्टात!

राहाता | महेंद्र जेजुरकर| Rahata

गोदावरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी त्या लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचा चेंडू आता संबंधित आमदारांच्या कोर्टात टोलावला आहे. त्यामुळे होणारी बैठक आता राहाता येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर कोपरगावात आमदार अशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

- Advertisement -

सार्वमतने गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक रखडल्याचे वृत्त रविवारच्या अंकात दिले होते. गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक ही नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. परंतु जलसंपदाच्या अधिकार्‍यांना भुजबळांची तारीख मिळत नसल्याने बैठक रखडल्याचे म्हटले होते. याच दिवशी भुजबळांनी अधिक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक तथा सदस्य सचिव कालवा सल्लागार समिती नाशिक यांना तसेच पत्र दिले आहे. त्यामुळे आता गोदावरी कालव्यांच्य बैठका आता संबंधीत आमदारांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. राहाता येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर कोपरगावची बैठक कोपरगावला आमदार अशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकींच्या तारखा येत्या दोन तीन दिवसात निश्चित होणार आहेत.

दरम्यान गोदावरी उजव्या तसेच डाव्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या नजरा या बैठकीकडे लागल्या आहेत. रब्बीत किती आणि उन्हाळी किती आवर्तने मिळतात? सिंचनाच्या आवर्तनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन घ्यावे लागणार आहेत. जायकवाडी धरणात पाणी न सोडल्याने रब्बी हंगामात दोन व उन्हाळी हंगामात तीन अशी एकुण पाच आवर्तने मिळतील अशी चर्चा लाभधारकांमध्ये आहे. कालवा सल्लागार बैठकीच्या संदर्भात दरवर्षीच विलंब होतो. आवर्तनाचे वेळीच नियोजन जाहिर न केल्याने शेतकर्‍यांना रब्बीच्या नियोजनाबाबत ठोस निर्णय घेता येत नाही. त्याचा विपरित परिणाम हंगामावर होतो. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुर्वीप्रमाणे लाभक्षेत्रात बैठका घ्याव्यात, असे जनमत दिसुन येत आहे. या संदर्भात धोरणात्मक बदल होण्यासाठी या वर्षी होणार्‍या बैठकांमध्ये तसा ठराव करुन शासनाकडे पाठविणे गरजेचे आहे, अशी सार्वत्रिक भावना दिसून येत आहे.

ना. भुजबळ यांनी आपल्याला राहाता तसेच कोपरगावच्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे सुचविले आहे. आपण दोन दिवसांत शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांच्याशी संपर्क करून कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्याबाबत तारीख घेऊ, येत्या आठवडाभरात ही बैठक होईल.

– श्रीमती अलका अहिरराव (अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक तथा सदस्य सचिव कालवा सल्लागार समिती)

- Advertisment -

ताज्या बातम्या