राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
अस्तगाव राहाता शिवेवर गोदावरीच्या उजव्या कालव्यात दोन दिवसांपूर्वी जन्मलेले पुरुष जातीचे मृत अवस्थेतील अर्भक पाण्यावर तरंगताना आढळून आले आहे.
गोदावरी कालव्यातून तीन दिवसांपूर्वी बिगरसिंचन व सिंचनाचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या कालव्यात एक दोन दिवसांपूर्वी जन्मलेले अर्भक अस्तगाव राहाता शिवेजवळील 15 चारी जवळील सदाफळ वस्तीजवळ 200 फूट अंतरावर किरण गोरख तासकर यांना दिसले. तासकर हे राहात्याच्या दिशेने जात असताना गोदावरीच्या उजव्या कालव्यात कालव्याच्या डाव्या बाजुला हे अर्भक पाटाच्या पाण्यात तरंगत असल्याचे दिसले.
त्यानंतर तेथे आसपासचे लोक जमा झाले. त्यातील काही लोकांनी राहाता पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथील लोकांच्या मदतीने ते अर्भक पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढले. ते मृत असल्याची पोलिसांची खात्री झाली.
हे अर्भक दोन दिवसांपूर्वी जन्मलेले असावे, अज्ञात स्त्रीने अपत्य जन्माची लपवणूक करण्याच्या उद्देशाने पाटाच्या पाण्यात टाकून दिले. त्यात हे अर्भक मयत झाले आहे. म्हणून त्या अज्ञात स्त्री विरुध्द राहाता पोलीस ठाण्यात किरण गोरख तासकर यांनी फिर्याद दिली आहे. वरील फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात महिले विरुध्द गुन्हा रजि. नंबर 134/2023 भादवि कलम 318 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणाचा तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिलीप तुपे करत आहेत. या अर्भकाविषयी कुणाला काही माहिती असल्यास राहाता पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहनही तुपे यांनी केले आहे.