राहाता (तालुका प्रतिनिधी)
गोदावरीच्या उन्हाळी पहिल्या आवर्तनासाठी उजव्या तसेच डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्यातील पाणी ७२ तासांनंतर राहाता तसेच अस्तगाव परिसरात पोहोचणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता गोदावरीचा उजवा कालवा १५० क्युसेकने तर कोपरगावच्या दिशेने वाहणारा डावा कालवा १०० क्युसेकने सोडण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार आहे. या आवर्तनासाठी दारणा धरणातून ११०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
या हंगामासाठी जलसंपदा विभागाने पाणी मागणीचे ७क्रमांकाचे अर्ज शेतकऱ्यांनी ५ मार्च पर्यंत करावेत, असे आवाहन केले होते. या हंगामात २ ते अडीच हजार हेक्टरसाठी शेतकऱ्यांनी पाणी मागणी करणे अपेक्षित असते. मात्र लाभधारक शेतकऱ्यांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येते. २८ फेब्रुवारी अखेर ४०० हेक्टरची मागणी नोंदली गेली आहे. अजून ५ दिवस बाकी असल्याने उर्वरित शेतकरी सात क्रमांकाचे अर्ज दाखल करतील.
या आवर्तनासाठी महिनाभर उजवा कालवा चालेल, असे जलसंपदाचे नियोजन आहे. लाभधारक शेतकरी किती प्रमाणात अर्ज दाखल करतील त्यावर कालवा किती दिवस चालेल हे ठरणार आहे. दरम्यान तीव्र उन्हामुळे पिके सुकून चालली आहेत. लाभक्षेत्रातील उभी पिके अडचणीत आली आहेत. आवर्तन तात्काळ सुरु करावे, अशी मागणी असल्यामुळे पहिल्या टप्प्यात सिंचनाचे आवर्तन सुरु होऊ शकेल. त्यानंतर पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे.
मागील वर्षीच्या उन्हाळी हंगामात उन्हाळी आवर्तन उशिरा सुटले होते. त्यामुळे लाभक्षेत्रातील खोडवा पिकाला पाणी मिळाले नव्हते. पिके होरपळली होती. त्यानंतर पावसाचे प्रमाणही कमी राहिल्याने खोडवा ऊस फक्त जिवंत राहिला. त्याची नैसर्गिक वाढ झाली नाही. त्यामुळे खोडव्याचे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. त्यावेळी उन्हाळी आवर्तनासाठी पाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आग्रहामुळे त्या आवर्तनात मिळाले होते. मात्र ते उशिराने सुटल्याने खोडवा उसाचे उत्पादन कमी मिळाले, असे लाभधारक शेतकरी राजेंद्र कार्ले यांनी सांगितले. याही उन्हाळी आवर्तनात लाभधारकांनी पाच मार्चपर्यंत जास्तीत जास्त अर्ज दाखल करावेत, असा आग्रह श्री. कार्ले यांनी केला आहे.
मागील रब्बीच्या हंगामात २५०० हेक्टरची मागणी अपेक्षित होती. मात्र लाभधारक शेतकऱ्यांनी अवघी १३०० हेक्टर ची मागणी नोंदवली होती. त्यामुळे आवर्तन कालावधी घटला होता. जलसंपदा विभाग शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सात क्रमांकाचे अर्ज दाखल व्हावेत यासाठी आग्रही आहे. शेतकऱ्यांनी सात क्रमांकाचे पाणी मागणी अर्ज जास्तीत जास्त संख्येने भरावेत, असे आवाहन जलसंपदाचे राहाता उपविभागाचे उपाभियंता संभाजी पाटील यांनी केले आहे.
शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजताचे धरणांचे आकडेवारी अशी- दारणा ७५.४२ टक्के, मुकणे ६४.८७ टक्के, वाकी ६२.१२ टक्के, भाम ५८.५२ टक्के, भावली ४१.२८ टक्के, वालदेवी ८२.७९ टक्के, गंगापूर ७४.९२ टक्के, कश्यपी ९३.५७टक्के, गौतमी गोदावरी २१.८४ टक्के, कडवा ४१.६५ टक्के, आळंदी ५२.२१ टक्के असे साठे आहेत.