Sunday, December 15, 2024
Homeनगरगोदावरी कालव्याचे हक्काचे पाणी द्या, आवर्तन पूर्ण करा

गोदावरी कालव्याचे हक्काचे पाणी द्या, आवर्तन पूर्ण करा

लाभक्षेत्रातील संतप्त शेतकर्‍यांचे जलसंपदाला निवेदन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गोदावरी कालव्याचे सुरू असलेल्या उन्हाळी आवर्तनाचे 800 दशलक्ष घनफूट पाणी कमी करून वैजापूर, गंगापूर तालुक्यांसाठी असणार्‍या जलद कालव्याच्या लाभक्षेत्राला देण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतल्याने गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी उन्हाळी आवर्तनाचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी येथील जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देऊन हक्काच्या पाण्याच्या घोषणा दिल्या. जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, दुष्काळामुळे विहिरीमध्ये पाणी राहिलेले नसून कालवा लाभक्षेत्रातील चारा पिके, फळबागा जळत आहेत.

- Advertisement -

चालू वर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये कालवा परिसरातील शेतकर्‍यांनी पाण्याची बचत करून उन्हाळी हंगामात कमीत कमी एक शेती सिंचन आवर्तन होईल. एवढे पाणी शिल्लक ठेवले होते. वैजापूर, गंगापूर या तालुक्यांसाठी जलद कालवा अंतर्गत सिंचनासाठी व पिण्यासाठी मंजूर असलेले सर्व पाणी वापरलेले आहे. असे असतानाही गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने गोदावरी कालव्यांचे उन्हाळी आवर्तन चालू असताना अचानकपणे आदेश काढून 800 दशलक्ष घनफूट पाणी जलद कालव्याला सोडण्याचा निर्णय घेऊन ते पाणी सोडले आहे. त्यामुळे गोदावरी कालवा परिसरातील सिंचन व्यवस्था धोक्यात आलेली आहे. यामुळे या परिसरातील चारा पिके, फळबागा व ऊस पिके जळून खाक होणार आहेत. या निर्णयामुळे शेतकर्‍यांचे न भरून येणारे नुकसान होणार आहे.

महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियम प्राधिकरण यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे पाणी वितरण होणे आवश्यक होते. परंतु गोदावरी कालव्यांच्या कोट्याप्रमाणे कालव्यांना पाणी देण्यात आलेले नाही. एक्सप्रेस जलद कालव्याच्या वाटेचे पाणी खरीप रब्बी हंगामामध्ये उधळपट्टी करून वापरले गेले आहे. आता पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली गोदावरी कालव्याचे पाणी जलद कालव्यामध्ये सोडण्यात आले आहे. गोदावरी उजवा व डावा कालव्यासाठी मंजूर हक्काचे असलेले पाणी मुखाशी मोजून आमच्या कालव्यांना देण्यात यावे. त्यामुळे आमचे भागातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी मंजूर झालेले पाणी मिळेल तसेच नांदूर मधमेश्वर प्रकल्पावर गोदावरी नदीवर आणखी 9 वक्राकार दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे गोदावरी उजवा व डावा कालव्यांना खरीप हंगामामध्ये पाणी येणे दुरापास्त होणार आहे. गोदावरी नदीला पुराची परिस्थिती असली तरी कालवे कोरडे राहणार आहेत. गोदावरी कालव्यांना खरीप हंगामामध्ये भर पावसाळ्यात पाणी उपलब्ध होणार नाही. या सर्व कारणांमुळे नांदूर मधमेश्वर बंधार्‍याला नऊ वक्राकार दरवाजे बसविण्यास लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे हे काम करण्यात येऊ नये तसेच नगर नाशिक विभागीय सिंचन कार्यालय मराठवाडा विकास महामंडळाला जोडलेले आहे. मराठवाडा विकास महामंडळ औरंगाबाद येथे असल्याने नेहमीच निर्णय घेताना नगर-नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा विचार न करता त्यांच्यावर अन्याय होत असून त्यांना वेठीस धरून निर्णय घेतले जातात.

त्यामुळे नगर-नाशिक जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था पूर्णपणे धोक्यात आली आहे. याचा विचार करून नगर-नाशिक विभागासाठी नाशिक येथे स्वतंत्र सिंचन विकास महामंडळ कार्यालय सुरू करण्यात यावे तसेच गोदावरी कालवे रुंदीकरणाचे काम बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित आहे कालव्याची वाहन क्षमता वाढवून सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक असून जेणेकरून आवर्तनाचा कालावधी कमी होऊन पाणी बचत होईल व त्याचा फायदा सिंचनासाठी होईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी गणेश कारखान्याचे संचालक अ‍ॅड. नारायण कार्ले, गणेशचे उपाध्यक्ष विजय दंडवते, प्रतापराव जगताप, संचालक संपतराव चौधरी, नानासाहेब नळे, भगवान टिळेकर, बाळासाहेब चोळके, अनिल गाढवे, महेंद्र गोर्डे, मोहनराव सदाफळ, नानासाहेब बोठे, राजेंद्र बावके, रावसाहेब गाढवे, महेंद्र शेळके, डॉ.राजेंद्र पिपाडा, पांडुरंग भातोडे, अविनाश टिळेकर, राजेंद्र दंडवते, अ‍ॅड. पंकज लोंढे, नितीन सदाफळ, आर. बी. चोळके, बशीरभाई शेख, चंद्रभान धनवटे, रवींद्र मेहेत्रे, बबलू कार्ले तसेच लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

गोदावरी कालव्यांच्या चालू उन्हाळी आवर्तनात 800 दशलक्ष घनफूट पाण्यात कपात करण्यात आल्यामुळे फक्त फळबागांनाच पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून आवर्तन सात ते आठ दिवस चालणार आहे. 3 जूनपर्यंत आवर्तन पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

-अरुण निकम उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या