राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
गोदावरी च्या दोन्ही कालव्यांवरील खरीप हंगाम सिंचनाच्या आवर्तनासाठी सात क्रमांकाच्या पाणी मागणी अर्जाची मुदत 15 ऑगस्टपर्यंत होती. जलसंपदाने आठ दिवस त्यात वाढ करून ती 23 ऑगस्ट केली आहे. त्यामुळे राहिलेल्या लाभधारक शेतकरी वर्गाला पाणी मागणीचे अर्ज भरता येतील.
जलसंपदा विभागाने गोदावरीच्या उजव्या तसेच डाव्या कालव्याचे पाणी खरीप हंगामातील सिंचनासाठी देता यावे म्हणून पाणी मागणीचे अर्ज क्रमांक 7 भरून द्यावेत, असे आवाहन केले होते. तसे जाहीर प्रकटनही काढण्यात आले होते. 15 ऑगस्ट ही अंतिम मुदत जलसंपदाने शेतकर्यांना दिली होती. त्यानुसार काही शेतकर्यांनी पाणी मागणी अर्ज संबंधित शाखेत भरून दिले. उजव्या कालव्यावर यासाठी 1306 अर्ज दाखल झाले होते. 1594 हेक्टर क्षेत्रासाठी उजव्या कालव्यावर पाण्याची मागणी आली.
विभागानुसार उजव्या कालव्यावर सोमठाणा 38.38 हेक्टर, कोळगाव 636.10 हेक्टर, हरिसन ब्रँच 176.46 हेक्टर, शिर्डी 120.67 हेक्टर, राहाता 328.60 हेक्टर, चितळी 178.33 हेक्टर, 20 चारी 115.48 हेक्टर असे एकूण 1594.02 हेक्टरची मागणी जलसंपदाकडे 15 ऑगस्टच्या 6.15 वाजे पर्यंत प्राप्त झाली होती. डाव्या कालव्यावर 730 शेतकर्यांनी 1189.13 हेक्टर क्षेत्राला मागणी केली. विभागानुसार मागणी अशी- मधमेश्वरला 20 हेक्टर, देवगावला 170.76 हेक्टर, ब्राम्हणगाव 241.38 हेक्टर, कोपरगाव 140 हेक्टर, पढेगाव 616.99 हेक्टर अशी मागणी आली.
दोन्ही कालव्यावर कमी मागणी नोंदविली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने पाणी मागणी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून ती 23 ऑगस्ट केली असल्याने राहिलेल्या शेतकर्यांना आता पाणी मागणी अर्ज दाखल करता येतील, राहिलेल्या शेतकर्यांनी पाणी मागणीचे 7 क्रमांकाचे अर्ज वेळेत संबंधीत शाखा कार्यालयात दाखल करावेत, असे आवाहन जलसंपदाच्या नाशिक विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शाहाणे यांनी केले आहे.