Monday, May 27, 2024
Homeनगरचिंता मिटली, जायकवाडीने गाठली पासष्टी!

चिंता मिटली, जायकवाडीने गाठली पासष्टी!

राहाता | Rahata

दारणा, गंगापूरच्या पाणलोटात पावसाचा जोर काहिसा ओसरला आहे. मात्र मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. धरणांचे विसर्ग कमी करण्यात आले असून काल नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 35 हजार 902 क्युसेकने विसर्ग सुरु होता. खाली जायकवाडीत उपयुक्तसाठा काल शनिवारी रात्री 65 टक्के झाला. जायकवाडीने पासष्टी गाठल्याने नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे संकट टळणार आहे. काल या धरणात 46 हजार क्युसेक पाण्याची आवक होती.

- Advertisement -

जूनमध्ये पावसाने दडी मारली. मात्र जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात धरणक्षेत्रात दिलासादायक पाऊस झाला. नाशिकचे बहुतांशी धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक झाली. भावली, वालदेवी, आळंदी, ओझरखेड, वाघाड, तिसगाव, हरणबारी, केळझर हे लघुप्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर अन्य धरणांमध्ये वाकी वगळता 65 टक्क्यांच्या पुढे पाणी साठा आहे. पाऊस शिल्लक असल्याने धरणांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठवता येत नाही. त्यामुळे 65 ते 70 टक्के पाणी साठे स्थिर ठेवुन नव्याने दाखल होणार्‍़या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

काल दारणातून 6602 क्युसेक, कडवातून 1294 क्युसेक, वालदेवीतून 183 क्युसेक, गंगापूरमधून 2754 क्युसेक, आळंदीतुन 961 क्युसेक असा विसर्ग करण्यात येत होता. काल सायंकाळी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने 35904 क्युसेकने विसर्ग गोदावरीत करण्यात येत होता. काल शनिवारी सकाळी 6 वाजता या धरणातुन 44768 क्युसेक इतका विसर्ग करण्यात येत होता. वरील धरणातून पाण्याची आवक कमी झाल्याने हा विसर्ग 35904 क्युसकेवर आणण्यात आला आहे. काल सकाळी 6 पर्यंत या बंधार्‍यातून गोदावरीत 23.4 टिएमसी एकूण पाण्याचा विसर्ग करण्यात आला. म्हणजेच 2 लाख 71 हजार 70 क्युसेक इतका एकूण विसर्ग करण्यात आला.

गोदावरीतून जायकवाडीत पाण्याची आवक होत असल्याने काल शनिवारी सायंकाळी 6 वाजता जायकवाडी जलाशयात 64.68 टक्के उपयुक्तसाठा झाला होता. म्हणजेच हा साठा 49.5 टिएमसी इतका झाला आहे. रात्रीतून हा साठा 65 टक्क्यांच्या पुढे सरकणार आहे. काल सायंकाळी 6 वाजता या धरणात 46000 क्युसेक ने नविन पाण्याची आवक होत होती. जायकवडीत मृतसह एकूणसाठा 75.6 टिएमसी झाला होता. म्हणजेच तो 73.64 टक्के इतका आहे. पाण्याची आवक होत असल्याने व अजुनही पाउस शिल्लक असल्याने नाशिक बरोबरच नगर च्या धरणांमधुनही पुढे जायकवाडी जलाशयात पाण्याची आवक होणार आहे. त्यामुळे हे धरण याही वर्षी 100 टक्के भरण्याचे संकेत आहेत.

गोदावरीचे कालवे आज होणार वाहते !

दरम्यान कोरडे ठाक पडलेले गोदावरीचे दोन्ही कालवे दोन दिवसात सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती समजली आहे. नदी विसर्ग पुर्ण दाबाने सुरु असल्याने गोदावरी कालव्यांचे मुखाजवळील दाबाने पाणी येण्यासाठी नदी विसर्ग कमी करावा लागतो. विसर्ग कमी केला तर नांदूरमधमेश्वर चे बॅकवाटर शेतकर्‍यांच्या शेतात जाते. त्यामुळे आता विसर्ग कमी झाला असल्याने व पाण्याची आवक कमी झाल्याने गोदावरीचे दोन्ही कालव्यांना आज पाणी सोडले जाणार आहे. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणी सोडावे, अशी मागणी केली होती. त्याला प्रतिसाद मिळाल्याने लाभधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या