Saturday, May 18, 2024
Homeनगरगोदापात्रातून फरांडीच्या साह्याने होतोय दररोज शेकडो ब्रास अवैध वाळूउपसा

गोदापात्रातून फरांडीच्या साह्याने होतोय दररोज शेकडो ब्रास अवैध वाळूउपसा

कोळपेवाडी |प्रतिनिधी| Kolpewadi

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून फरांडीच्या साह्याने दिवस रात्र अवैध वाळूउपसा सुरू आहे. तस्करांना कुणाचेही भय उरले नाही. शहरासह तालुक्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊन वाळूतस्करी व घरफोडीच्या घटनेने उच्चांक गाठला असल्याने महसूल व पोलीस प्रशासना प्रती नागरिकांमध्ये नाराजी आहे.

- Advertisement -

कोपरगावचे माजी तहसीलदार विजय बोरुडे हे खासगी स्वीय सहाय्यका मार्फत वाळूतस्कराकडून लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाईमध्ये रंगेहाथ पकडले. त्यानंतर गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणार्‍या तस्करांची हिम्मत वाढली आहे. पूर्वी रात्रीच्या सुमारास नदीपात्रातून होणारी वाळूतस्करी आज वाहत्या पाण्यामधून फरांडीच्या साह्याने दिवस रात्र होत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाला याची खबर नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही विभाग आर्थिक मायेपोटी सर्व काही आलबेल असल्याचे भासवित आहे.

महसूल विभागाने तालुक्यात वाळू साठवणूक केलेल्या साठ्याचे ड्रोन द्वारे केलेले सर्वेक्षण मोजमाप अहवाल अद्यापही आला नाही. अवैध वाळू तस्करीमध्ये महसूल विभागाने ट्रॅक्टर पकडल्यानंतर दंड वसूल करत सोलन्सी घेऊन ट्रॅक्टर पुन्हा अवैध वाळूतस्करी मध्ये सापडल्यास जप्त करण्याचे अधिकार असताना मागील गुन्ह्यास महसूल विभाग अभय देण्याचे काम करत आहे. त्यामुळे वाळूतस्करी जोमात असल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र बघायला मिळत आहे. प्रांताधिकारी व कोपरगाव महसूल विभागाने संयुक्त कारवाई केल्यास तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून होणारी अवैध वाळूतस्करीचे समुळ उच्चाटन करणे अवघड नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या