Friday, July 5, 2024
Homeनगरपुणतांबा गोदावरी नदीपात्रात बेसुमार अवैध वाळू उपसा

पुणतांबा गोदावरी नदीपात्रात बेसुमार अवैध वाळू उपसा

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

- Advertisement -

येथील गोदावरी नदीपात्रात सध्या सूर्यास्त झाल्यानंतर अत्याधुनिक साधनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूचा उपसा व वाहतूक केली जात आहे. 13 मे च्या अगोदर महसूल, पोलीस यत्रंणेसह बहुतेक विभागाचे अधिकारी निवडणूक प्रक्रियेत गुंतले होते. या काळात परिसरातील वाळूतस्करांना सुगीचे दिवस आले होते. त्यांच्यावर नियत्रंण ठेवणार्‍यांना इलेक्शन ड्युटीची सबब मिळाली होती. मात्र 13 मे ला मतदान झाल्यानंतर महसूल कर्मचारी वाळूतस्करावर कठोर कारवाई करतील ही पुणतांबा ग्रामस्थांची अपेक्षा फोल ठरली आहे.

गोदावरी नदीपात्रात निम्मी हद्द अहमदनगर जिल्ह्याची तर निम्मी हद्द छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळ कोण कोणत्या हद्दीतून वाळूचा उपसा करतो याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे वैजापूर व राहाता तालुक्यातील महसूलचे अधिकारी व पोलीस यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. दोन्ही तालुक्यातील अधिकार्‍यांनी बेकायदा वाळू उपशावर धडक व ठोस कारवाई केल्याचे उदाहरण नाही. सर्वसामान्य जनतेला घरकुल तसेच घर बांधण्यासाठी स्वस्त दरात वाळू मिळावी म्हणून मागील वर्षी मोठा गाजावाजा करून गोदावरी नदीच्या काठावर पुरणगावकडे जाणार्‍या रोडलगत शासकीय वाळू डेपो सुरु करण्यात आला होता.

चालू वर्षी ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही वाळू डेपो सुरु करण्यात आला नाही. याचे कारण ग्रामस्थांना माहित आहे. परिसरात रात्रीच्या वेळी गोदावरी नदीपात्रातून बेकायदा वाळूचा उपसा करून त्याची बेकायदा वाहतूक करणारी वाहने पुणतांबा गावातून तसेच रेल्वे लाईनच्या कडेला असलेल्या रसत्यावरून वेगाने जात असतात. त्यांच्या वेगामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. तसेच रात्रीपासूसकाळी 7 वाजेपर्यत ही साधने धाडधाड आवाज करत गावातून जातात. त्यामुळे रात्रभर ग्रामस्थांना व्यवस्थित झोप येत नाही असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पुणतांबा येथील गोदावरी नदीपात्रातू न होणार्‍या बेकायदा वाळूचा उपसा थांबवावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने धडक आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाचे राहाता तालुका अध्यक्ष संदीप वहाडणे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या