Friday, November 22, 2024
Homeनगरगोदावरीतील विसर्ग 3155 क्युसेकवर

गोदावरीतील विसर्ग 3155 क्युसेकवर

पावसाचा जोर ओसरला, जायकवाडीत 10260 क्युसेकने आवक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणातील विसर्ग कमी करण्यात आल्याने गोदावरीतील विसर्ग 3155 क्युसेकवर आला. दारणातील विसर्ग 2624 क्युसेकवर तर कडवाचा 600 क्युसेकवर आला आहे. गंगापूर धरण 57 टक्क्यांवर तर कडवा 91.88 टक्क्यांवर पोहचले आहे.

- Advertisement -

शनिवारी सकाळी मागील 24 तासात दारणाच्या पाणलोटातील घोटी येथे 31 मिमी, इगतपुरी येथे 36 मिमी असा मध्यम स्वरुपाचा पाऊस नोंदला गेला. दारणाच्या भिंतीजवळ 10 मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर ओसरल्याने दारणाचा विसर्ग कमी करत तो सायंकाळी 2624 क्युसेक इतका करण्यात आला. 7149 क्षमतेच्या दारणात 5965 दलघफु पाणीसाठा आहे. 83.44 टक्के साठा स्थिर ठेवून नवीन येणारे पाणी विसर्गाच्या रुपात बाहेर टाकले जात आहे. काल सकाळी 6 पर्यंत दारणातून नांदूर मधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने 1598 दलघफू म्हणजेच 1.6 टिएमसी विसर्ग करण्यात आला आहे. 100 टक्के भरलेल्या भावलीच्या भिंतीजवळ 18 मिमी पावसाची नोंद झाली.

भाम 100 टक्के भरले असल्याने त्याच्या सांडव्यावरुन सकाळी 1440 क्युसेकने विसर्ग सुरु होता. वाकी धरण 40.05 टक्क्यांवर पोहचले आहे. मुकणे 32.09 टक्क्यांवर पोहचले आहे. वालदेवी 62.05 टक्के भरले आहे. कडवा धरण 91.88 टक्के भरले आहे. गंगापूर धरणाच्या परिसरात कालही पावसाचा जोर मंदावला होता. काल सकाळी मागील 24 तासात गंगापूरच्या पाणलोटातील त्र्यंबक व अंबोली येथे 12 मिमीची नोंद झाली. गंगापूरच्या भिंतीजवळ 11 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपी येथे 3 मिमी, गौतमी गोदावरी येथे 6 मिमी असा पाऊस नोंदला गेला. गंगापूर धरण 56.87 टक्के, कश्यपी 28.67 टक्के, गौतमी गोदावरी 54.87 टक्के, आळंदी 21.08 टक्के असा साठा आहे.

खाली नांदूर मधमेश्वर बंधार्‍यात येणारे वरील धरणातील विसर्ग घटल्याने काल सायंकाळी गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने वाहणारा विसर्ग 3155 क्ुयसेकवर आणण्यात आला आहे. काल सकाळी 6 पर्यंत या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने 2.2 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. काल सायंकाळी 6 वाजता जायकवाडी जलाशयात गोदावरीतून 10 हजार 260 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. या जलाशयाचा उपयुक्तसाठा 5.79 टक्के झाला आहे. 4.4 टिएमसी उपयुक्तसाठा तर मृतसह एकूण साठा 30.6 टिएमसी इतका आहे. दरम्यान दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपुरीला काल दिवसभर पावसाने उघडीप दिली होती मात्र सायंकाळी पावसाने पुन्हा जोर धरला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या