राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
धुव्वाधार पावसाने सह्याद्रीचा घाटमाथा झोडपून काढला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची दमदार रिपरिप सुरु असल्याने धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे विसर्गही मोठ्या प्रमाणात होत आहे. दारणातून काल रात्री 9 वाजता 14812 क्युसेक, गंगापूर मधून 8428 क्युसेक तर खाली नांदूरमधमेश्वर 15775 क्युसेकने विसर्ग सुरु होता. रात्रीतून हा विसर्ग 30169 हजार क्युसेकने विसर्ग सुरु झाला होता. काल दिवसभरही पावसाने जोरदार बॅटिंग केली. काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासात गंगापूरच्या पाणलोटातील त्र्यंबक येथे 106 मिमी पावसाची नोंद झाली. अंबोलीला 80 मिमी, गंगापूरच्या भिंतीजवळ 31 मिमी पावसाची नोंद झाली.
यामुळे धरणात नविन पाण्याची आवक सुरु आहे. शनिवारी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या 12 तासात पावसाची संततधार सुरु होती. गंगापूरला 79 मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबक येथे 32 मिमी, अंबोलीला 55 मिमी, कश्यपीला 55 मिमी, गौतमीला 28 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी 8 वाजता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला 520 क्युसेकने विसर्ग गोदापात्रात सोडला जावू लागला. या धरणाच्या दिशेने गौतमी गोदावरीतून 512 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला. गंगापूरचा विसर्ग 520 वरुन सकाळी 10 वाजता 1059 क्युसेक करण्यात आला. दुपारी 1 वाजता हा विसर्ग वाढवत तो 2382 क्युसेक करण्यात आला. पुन्हा 4 वाजता 3970 क्युसेक तर नंतर सायंकाळी 6 वाजता 7413 क्युसेक इतका करण्यात आला. नंतर तासाभराने तो सायंकाळी 7 वाजता 8428 क्युसेक इतका करण्यात आला. पावसाचा जोर वाढल्यास टप्प्या टप्प्याने या विसर्गातही वाढ होणार आहे.
दारणाचा घाटमाथा पावसाने चांगलाचा झोडपून काढला. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 115 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीला 58 मिमी, भावलीला 54 मिमी पावसाची नोंद झाली. दारणाच्या भिंतीजवळ 68 मिमी पावसाची नोंद झाली होती. सकाळी 6 वाजता दारणातुन 1300 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो सकाळी 8 वाजता 2082 क्युसेक करण्यात आला. दुपारी 12 वाजता 2864 क्युसेक करण्यात आला. दुपारी 2 वाजता 4428 क्युसेक करण्यात आला. चार वाजता तो 7524 क्युसेक करण्यात आला तर सायंकाळी 7 वाजता 7524 क्युसेकवरुन 11986 करण्यात आला. दारणातील पाण्याची आवक पाहता, दारणातून रात्री 15 हजार क्युसेक इतका विसर्ग होण्याची चिन्हे आहेत. दारणात भावलीतून 701 क्युसेक, भाम मधून 2170 क्युसेक असा विसर्ग दाखल होत आहे. कडवा धरणातून 1252 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे.
कडवातील विसर्ग रात्री 9 वाजता 2526 क्युसेक करण्यात आला आहे. भोजापूर मधून 1524 क्युसेक, वालदेवीतून 107 क्युसेक, आळंदीतून 80 क्युसेक असा विसर्ग सुरु आहे. नाशिकच्या पुर्व भागातील निफाड तालुक्यातील सायखेडा परिसरातील ओढे नाले यांचे पाणी तसेच दारणा, गंगापूर, कडवा, भोजापूर धरणातील विसर्ग नांदूरमधमेश्वर बंधार्यात दाखल होत असल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्याचे गोदावरीतील पाच वक्राकार दरवाजे प्रत्येकी एक मिटरने उघडण्यात आले आहेत. काल सायंकाळी 7 वाजता या बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 15775 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. वरील धरणांमधून रात्रीतुन विसर्ग वाढणार असल्याने गोदावरीत रात्रीतुन 20 ते 25 हजार क्युसेकने विसर्ग सोडला जावु शकतो. यामुळे गोदावरी दुथडी भरुन वाहात आहे. त्यामुळे गोदावरीच्या काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दारणा समुह तसेच गंगापूर समुहातील सर्वच धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे विसर्ग रात्रीतुन वाढु शकतील.
जायकवाडी 38 टक्के
दरम्यान निळवंडे धरणातून प्रवरेत काल सायंकाळी 6 वाजता 22550 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. मुळा नदीतून 2000 क्युसेकने विसर्ग तसेच नांदूरमधमेश्वर बंधार्यातून गोदावरीत 15775 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. गोदावरीतील जास्तीचा विसर्ग जायकवाडी जलाशयात पोहचण्यास काही तासांचा अवधी आहे. काल सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार जायकवाडी जलाशयात 27 हजार 562 क्युसेकने नवीन पाणी दाखल होत होते. काल सायंकाळी हे धरण 37.94 टक्के भरले होते. अजुनही नगर नाशिकच्या धरणातून विसर्ग दाखल होत आहेत. काल सायंकाळी उपयुक्तसाठा 29 टिएमसी इतका झाला होता. तर मृतसह एकूण साठा 55.1 टिएमसी इतका झाला होता. जायकवाडीत उपयुक्तसाठा 37.94 टक्के झाला आहे. हा साठा 65 टक्के होण्यासाठी या धरणात अजुन 21 टिएमसी पाण्याची गरज आहे. म्हणजेच समन्यायी प्रमाणे या धरणात उपयुक्तसाठा 50 टिएमसी इतका असावा, तो काल सायंकाळी 29 टिएमसी इतका झाला होता. 27 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर टिकून राहाणार असल्याने या धरणात अपेक्षीत साठा होईल, असा अंदाज आहे.
यावर्षी नैऋत्य मान्सूनपेक्षा पुर्वेकडील पावसाचे प्रमाण जादा राहणार आहे. हा पाऊस जोरात बरसतो. सध्या महाराष्ट्र गुजरात सरहद्द परिसरात कमी दाबाचा पट्टा असून तो चक्रीय वादळात रुपांतरीत होत आहे. त्यामुळे 27, 28 ऑगस्ट पर्यंत जोरदार पाऊस होत राहील. 30 ऑगस्टच्या जवळपास बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले चक्रीय वादळामुळे 30 ऑगस्ट ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस पडणार आहे. ला निनो आणि हिंदी महासागरातील द्विधृव स्थिती अनुकुल असल्याने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सुध्दा पावसाचे प्रमाण चांगले राहील. त्यामुळे जायकवाडी यावर्षी 15 ऑक्टोबरपर्यंत 65 टक्के खात्रीने भरले जाईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे समन्यायीचे वादळ यावर्षी शांत राहील.
– उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग