Thursday, October 22, 2026
Homeनगरगोदावरीच्या पात्रावर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; ११ लाखांच्या मुद्देमालासह दोन वाळू तस्कर जेरबंद

गोदावरीच्या पात्रावर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; ११ लाखांच्या मुद्देमालासह दोन वाळू तस्कर जेरबंद

कोपरगाव (प्रतिनिधी)

नदीचे पात्र ओरबाडून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम उघडली आहे. कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर रविवारी पोलिसांनी अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत दोन वाळू तस्करांना रंगेहाथ पकडण्यात आले असून विनाक्रमांकाचे दोन ट्रॅक्टर आणि केणी असा तब्बल ११ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक आणि उपशाविरुद्ध पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कठोर कारवाईचे थेट आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक कोपरगाव परिसरात गस्त घालत असताना धारणगाव शिवारात गोदावरीच्या पात्रातून ट्रॅक्टर आणि केणीच्या साह्याने वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. माहितीची खातरजमा करून एलसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष नदीपात्रात धाडशी छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाळू माफीयांमध्ये प्रचंड घबराट पसरली.पोलिसांनी घटनास्थळावरून गणेश चंद्रभान नाईकवाडे आणि बाळू उर्फ नवनाथ गोपीनाथ सोनवणे (दोन्ही रा. धारणगाव) या दोन ट्रॅक्टर चालकांना जागेवरच ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी फरार आरोपी बबलू उर्फ सागर सुरेश चौधरी, नाना चंद्रभान नाईकवाडे (दोन्ही रा. धारणगाव) आणि शुभम कदम (रा. कुंभारी) यांच्या सांगण्यावरूनच हा वाळू उपसा करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी ५ लाख २ हजार रुपये किमतीचा पॉवरट्रॅक ट्रॅक्टर व केणी आणि ६ लाख रुपयांचा महिंद्रा ट्रॅक्टर असा एकूण ११ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांत नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांसह पर्यावरण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार तीन ट्रॅक्टर मालकांचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : सप्तशृंगी गडावरील गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक निर्बंधांत बदल

0
नाशिक | Nashik सप्तशृंगी गड (Saptshrungi Gad) येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी (Crowd) आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने वाहन प्रवेशबंदीच्या कालावधीत...