Monday, May 27, 2024
Homeनगरगोदावरीत 10272 क्युसेकने विसर्ग जायकवाडीत 19 हजारने आवक

गोदावरीत 10272 क्युसेकने विसर्ग जायकवाडीत 19 हजारने आवक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गंगापूर धरणाच्या पाणलोट संततधार सुरू असल्याने या धरणातून 4544 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक परिसरात व नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या पश्चिमेला वाहणारे ओढे, नाल्यांमुळे या बंधार्‍यात पाण्याची आवक टिकून असल्याने काल सायंकाळी 7 वाजता 10272 क्युसेकने विसर्ग सुरू होता.

- Advertisement -

काल सकाळपासून गंगापूरच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरू होती. परवा रात्री 10 वाजता 1136 क्युसेकने विसर्ग या धरणातून सुरू करण्यात आला होता. हा विसर्ग पावसाच्या सातत्यामुळे काल सकाळी 8 वाजता वाढवून 2272 क्युसेकवर नेण्यात आला. तो पुन्हा दोन तासांनी 10 वाजता 3408 क्युसेकवर नेण्यात आला. त्यामुळे नाशिक शहरात उथळ पात्रामुळे गोदावरीला पूरस्थिती निर्माण झाली होती. हा विसर्ग पुन्हा 4 वाजता वाढवत 4544 क्युसेकवर नेण्यात आला. हा उशीरापर्यंत टिकून होता. गंगापूरच्या तुलनेत दारणाच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दारणाचा विसर्ग काल 2708 क्युसेकवर स्थिर होता.पालखेड धरणातूनही ओव्हरफ्लो सुरू आहे. पालखेड मधून 1311 क्युसेकने विसर्ग सुरू होता.

वरील धरणांचे पाणी खाली नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने या बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने काल सायंकाळी 7 वाजता 10272 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. यासाठी या बंधार्‍याचे पाचही गेट काही प्रमाणात उचलण्यात आले आहेत. गोदावरीतील विसर्ग टप्प्या टप्प्याने कमी अधिक होत आहे. काल दुपारी 7117 क्युसेकने सुरू असलेला हा विसर्ग दुपारी चार नंतर 10272 क्युसेक इतका करण्यात आला. काल सकाळी 6 पर्यंत या बंधार्‍यात जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 11.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 1 लाख 34 हजार 655 क्युसेक इतका विसर्ग आतापर्यंत या हंगामात करण्यात आला आहे. या बंधार्‍यातून मागील तीन दिवसांत जवळपास दोन टीएमसी पाण्याचा विसर्ग गोदावरीत करण्यात आला आहे.

जायकवाडी उपयुक्तसाठा 36.35 टक्के !

काल जायकवाडी जलाशयात 19 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. यावेळी धरणात 27.87 टीएमसी उपयुक्तसाठा तयार झाला होता. हा साठा 36.35 टक्के इतका आहे. मृतसह एकूण साठा 53.94 टीएमसी इतका आहे. 1 जूनपासून जायकवाडीत 15 टीएमसी नवीन पाणी दाखल झाले. गेल्या वर्षी कालच्या तारखेला जायकवाडी जलाशयात उपयुक्तसाठा 99.23 टक्के इतका होता. यंदा कालच्या तारखेला तो 36.35 टक्के इतका आहे. गोदावरी नदीतील पाणी टिकून असल्याने आजही पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या