पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
पंचवटीतील काळाराम मंदिराच्या पूर्व गेट समोरील मूर्तीच्या दुकानांतून महालक्ष्मी देवीची मूर्ती चोरी गेली होती. मूर्ती चोरी करणाऱ्या संशयिताला जेरबंद करण्यास पंचवटी गुन्हे शोध पथकाला यश मिळाले आहे. या संशयिताकडून महालक्ष्मी मूर्ती हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमृतधाम, बिडी कामगार नगर येथील पस्तीस वर्षीय नरेंद्र रमेश लहामगे याचे काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्या समोर देवांच्या मूर्ती विकण्याचा व्यवसाय आहे. लहामगेच्या दुकानातून पितळी धातूची महालक्ष्मी देवीची मुर्ती चोरीला गेली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पंचवटी गुन्हे शोध पथकाचे गोदाघाट परिसरात गस्त घालीत होते. मूर्ती चोरणारा संशयित हा गंगाघाट येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचून संशयित अन्सार रहीम अख्तर (वय ३६, रा हुसेन चौक मनमाड, ता. मनमाड, जि. नाशिक) यास ताब्यात घेतले. पोलिस खाक्या दाखविताच गुन्ह्याची कबुली दिली. या संशयिताकडून २१ हजार रुपये किंमतीची एक पितळी महालक्ष्मी देवीची मुर्ती हस्तगत करण्यात आली.
गुन्हयाचा तपास पोलिस हवालदार के एन शिंदे करीत आहेत.सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त संगिता निकम,पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सतिश शिरसाठ, सहायक पोलिस उपनिरीक्षक संपत जाधव, पोलिस हवालदार शिंदे, महेश नांदुर्डीकर, काळे, लोणारे,पोलिस नाईक जयवंत लोणारे, पोलिस अंमलदार गायकवाड, कुणाल पचलोरे, अंकुश काळे, परदेशी, बहिकर, वायंकडे, चितळकर, पवार, महिला पोलिस अंमलदार शिंदे अशांनी पार पाडली .





