Tuesday, September 8, 2026
HomeनगरCrime News : गोगादेव महाराज जयंती मिरवणुकीत पोलिसावर हल्ला

Crime News : गोगादेव महाराज जयंती मिरवणुकीत पोलिसावर हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गोगादेव महाराज जयंतीनिमित्त रविवारी (6 सप्टेंबर) काढण्यात आलेल्या निशाण मिरवणुकीदरम्यान वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मिरवणूक पुढे नेण्याच्या सूचना देणार्‍या कोतवाली पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की व मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित तिघे गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले.
अनुप झाडबुके असे मारहाण झालेल्या अंमलदाराचे नाव आहे. त्यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार सुनील शंकर करांदे (रा. लक्ष्मी कारंजा, अहिल्यानगर) व तीन अनोळखी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रविवारी गोगादेव महाराज जयंतीनिमित्त माळीवाडा ते गोगादेव मंदिर, सर्जेपुरा या मार्गावर निशाण मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास नेताजी सुभाषचंद्र चौक परिसरात सात निशाण मंडळे एकत्र आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. तसेच मिरवणुकीसाठी देण्यात आलेली परवानगीची वेळही संपत आल्याने अंमलदार झाडबुके आणि देवेंद्र पांढरकर यांनी साध्या वेशात संबंधित मंडळातील सदस्यांना मिरवणूक पुढे मार्गस्थ करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी हिंदवी शौर्य ढोल वाद्य पथकातील एक सदस्य संतप्त झाला. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून त्याने इतर सदस्यांना मिरवणूक पुढे न नेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ करत झाडबुके यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली. तू कुठला पोलीस, तुझ्याकडे पाहतोच, अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर त्याच्या चिथावणीमुळे मिरवणुकीतील आणखी तीन अनोळखी व्यक्तींनीही शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वाजवी बळाचा वापर करून संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चारपैकी तीन जणांनी गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. सुनील करांदे याला ताब्यात घेतले आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात डीजेच्या दणदणाटाला लगाम

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे व ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत असलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा शासकीय व प्रशासकीय आदेशांचे...