काल माहेरी जाण्याची संधी आपणहूनच चालून आली. दुसर्या दिवशी पहाटेसच जाग आली. आली म्हणजे जागवलेच मला मोगर्याच्या दरवळीने. मी अंगणात गेले बहरलेल्या झाडाचा आधी फोटो काढला, मनामध्ये अर्धवट उमललेल्या कळ्या साठवल्या आणि गप्पा मारू लागले त्या फुलाशी.. तुम्हाला कसे कळले आज मला माहेरी जायचय?
हा सुगंध, हा श्वास साठवते मी मनात
मिळेल तितका सुगंध मिळेल तेवढा
आनंद वेचत होते पदरात
पहाटेसच सारी फुले परडीत वेचली, एकएक फुल माळत होते आणि त्या फुलांबरोबर आठवणींचा देखील दरवळ पसरत होता.रामप्रहारातच आई, काकू उठायच्या, अंगण झाडून सडासंमार्जन करायच्या. अंगणातील फुलं परडीत जमा करून आई देव्हार्याजवळ आणून ठेवायची. जशी ती परडी घेऊन आई घरात यायची तशी त्या फुलांच्या सुगंधाने जाग आलीच पाहिजे. ज्याला पहिले जाग येईल त्यांनी देवासाठीचे फुले बाजूला करायचे आणि राहिलेल्या फुलांचा गजरा माळायचा. वेगवेगळ्या केशभूषेत कापलेले ते केस त्यावर माळलेला गजरा. कोण काय म्हणेल याकडे लक्ष न देता मी माळायची माझ्या केसात. मला माहित होतं माझ्या केसांपेक्षा लांब सडक वेणीत जास्तच खुलून दिसेल हा गजरा तो ही मोगर्याचा. तोही नितळ मनाने माझी ओंजळ भरत राहिला, बहरत राहिला.
प्रत्येक स्त्रीचे मोगर्याशी, मोगर्याच्या गजर्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते असते. अगदी रागवलेल्या प्रेयसीला मानवण्यासाठी प्रियकराने घेतलेला गजरा असो किंवा लहान मुलगी शाळेतून येताना कुणाच्या अंगणात बहरलेल्या कळ्या गुपचुप तोडण्याचे भाव असो किंवा आजीसाठी आजोबांनी घेतलेला गजर्यातील भाव असो. आजही मोगर्याचा गजरा पाहिला की आठवते मला बालपण. मोगर्याच्या गंधात इतके न्हाऊन गेले किती वेळ झाला कळलेच नाही . माहेरच्या वाड्यात प्रवेश केला तर स्वागतासाठी पुन्हा मोगराच आणि गुणगुणू लागले
फुले वेचिता बहरू कळियासी आला
पुन्हा हरवले त्या मोगर्यातच येवढेसे रोप दिले होते सविताने आज किती वर गेलाय वेल अगदी आमच्या मैत्रीसारखा…इवलेसे रोप लावीयले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी…..आज माझ्या अंगणातील नेत्रसुखद मोगर्याच्या दर्शनाने जुन्या आठवणींना शब्द मिळाले मंद वार्याच्या लहरी बरोबर येणार्या त्या सुहासने दिवसभराची सगळी मरगळ गेली आणि नकळत ओठांनी गुंफले
मनाचिये गुंती गुंफियेला शेला
बाप रखुमादेवी वरी विठ्ठले अर्पिला
माधवी पोफळे
मन हा मोगरा
जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजालाकेलेत वार ज्याने तो मोगरा असावा,मोगर्याच्याच नजाकतीने इलाही जमादार त्याला या शेरात गुंफतात, मोगरा म्हटलें की त्याच्या सुगंधाच्या कल्पनेनेही मनाचा गाभारा भरून जातो. त्याची ओंजळ हुंगायची तर डोळे आपोआप बंद होतात. काही दैवी गोष्टी या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत, त्यात मोगर्याचं नाव घ्यायला हरकत नाही. त्या शुभ्रधवल पाकळ्या, ते इवलंसे रूप पाहून नवजात बाळाच्या तळव्यांची आठवण होते. त्याच्या गंधाची भूल पडली नाही असा माणूस विरळाच. त्याच्या सावलीत साप विसाव्याला येतात म्हणूनही मोगर्याची झाडें काढून टाकणारी लोकं बघितली आहेत, अर्थात त्यात तथ्य किती हा संशोधनाचा भाग आहे.मोगर्याच्या गजर्यांशिवाय कुठल्याही वधूचा शृंगार पूर्ण होऊ शकत नाही. सणवार, लग्नकार्य, किंवा इतर कुठल्याही समारंभात दिमाखाने मिरवावं ते मोगर्यानेच.
देवाच्या चरणी वाहून घेत कृतार्थ व्हावं, नि आपलं सुवासिक अस्तित्व आपल्यानंतरही दरवळत राहावं हे भाग्यही मोगर्याच्याच नशिबी.म्हणून तर समर्पणाची व्याख्या करताना ती या फुलांशिवाय अपूर्ण वाटते.ऋतुंशी सख्य ना माझे तुला पाहून फुलते मी मनाचा मोगरा होतो, कधी वेल्हाळ जास्वंदीआपल्या हृदयस्थ व्यक्तीच्या दर्शनाने किंवा त्याच्या आपल्या आयुष्यात असण्याच्या नुसत्या जाणिवेनेही मन फुलून येते तेव्हा ते साक्षात मोगराच होते, मनाचा मोगरा होणे ही निष्ठा आणि समर्पणाची अत्युच्च पातळी होय. त्यांनतर वाहून द्यावे असे काही उरतच नाही.हिरव्यागार झुडुपावर या कोवळ्या लुसलुशीत कळ्या जेव्हा शेकडोंच्या संख्येने उमलून येतात तेव्हा आकाशातील चांदण्याच जणू सुगंधाचे वरदान घेऊन पृथ्वीवर अवतरल्या की काय असे वाटून जाते.
ही श्रीमंती फांदीफांदीवरून ओसंडून वाहते. भर उन्हाळ्यात भरभरून फुलणार्या या फुलांनी चित्तवृत्ती किती प्रफुल्लित होतात हे मोजण्याचे काही मापही नाही नि त्याचे मूल्यही चुकते करता येत नाही. खाली कालच्या फुलांचा सडा अजून तस्साच आहे नि आज पुन्हा हा बहर उतू चाललाय किती वेचावा नि किती ठेवावा, मन भरत नाही, हे पाहून संत ज्ञानदेवांनाही मोह झालाच ते म्हणाले
मोगरा फुलला..मोगरा फुलला..फुले वेचिता बहरु कळीयांसी आला भगवंताच्या प्रेमाचा साक्षात्कार आणि परमानंद व्यक्त करण्यासाठी याहून देखणा दृष्टांत दुसरा कुठे मिळणार? प्रेम, भक्ती, समर्पण, सौंदर्य कुठल्याही वळणावर कलासक्त मन मोगर्याशिवाय परिपुर्णता मानू शकत नाही.
कवी संजय चौधरी म्हणतात
फूल म्हणजे ईश्वराची सही !!
किती सुंदर कल्पना आहे ही
एकतर तो सर्वशक्तिमान परमेश्वर
त्याचे हस्ताक्षर किती सुंदर असेल, त्यात त्याची सही म्हणजे कशी असेल? त्यासाठी फुलाहून सुंदर दुसरी उपमा काय असेल? चांदणीचीही उपमा इथे कवी घेत नाहीत, तिच्यात फुलासारखे मृदुत्व नाही, सुवास नाही. नाजूक पाकळ्यांचे लोभस विभ्रम नाहीत. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचे पाणी जातेगुलाब जाई जुई मोगरा फुलवितया गाण्यात आपल्या माहेरची समृद्धी, घरंदाजपणा, निसर्गवत्सलता, कलासक्त हळवेपणा यांचे वर्णन करतांना बांधावर किंवा अंगणात डवरलेल्या अनेक फुलझाडांपैकी मोगरा आनंदाने डोलत असतो. हे सुखाचे क्षण आणि दृश्य माहेरवाशिणीचे डोळे तृप्त करतात. मनाला आल्हाददायक गारवा देतात, संसारातल्या ग्रीष्मावर हाच काय तो उतारा, ती शीतल शिंपण.
वैशाखातला हा दाह, संसारातील विखार, निखार्याप्रमाणे होरपळ देतो. जरा कुठे सुखाच्या झुळुकेची चाहूल लागते तेव्हा मन पिसासारखे हलके होते. तेव्हा नाधो महानोरांच्या कवितेतली नायिका लाडीक हट्ट करते की
चांदकेवड्याची रात…
आलिया सामोरा राजा
माझ्या अंबाड्यात बांधावा गजराआनंदलहरींवर स्वार झालेले मन मोगर्याच्या सहवासासाठी आतुर होते. नि दुराव्याच्या दुःखाची सलही अधिक तीव्र होते ती या फुलांचे प्रश्नार्थक डोळे चुकवावे कसे या संभ्रमानेच. ती म्हणते,
नको नकोसे वाटते तुज वाचूनी चांदणेनको पाहणे आरसा वेणी गजरा माळणेहिरमुसल्या जुईचा कसा सोडवू अबोलाकाय सांगावे चाफ्याला, काय सांगू मोगर्याला?
फुलांशी निगडित हे भावबंध आदिम आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत इतकेच नाही तर मृत्यू पश्चातही फुलांची साथ सुटत नाही. कितीही कागदी फुले बाजारात आली तरी
फिर छिडी बात, रात फूलोंकी
हे होतच राहणार आहे आणि
लब हिले तो मोगरे के फूल खिलते है कहीम्हणणारी जमातही आपला वारसा पुढे नेतच राहणार. नाही का?
जयश्री वाघ