कोल्हापुर | Kolhapur
गोकुळचे अध्यक्षपद सतेज पाटलांच्या आघाडीकडे जाईल, अशी चर्चा सुरु असताना राज्य सरकारने चार सरकारी संचालकांची नियुक्ती करुन त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतल्याने समविचारी आघाडीला धक्का बसला होता. याचीच गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात प्रचंड चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत एकूण 25 जागांपैकी 13 जागांवर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे आणि 12 जागांवर महायुतीचे संचालक निवडून आले होते. आज सकाळी 11 वाजल्यापासुन गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुतीकडून अध्यक्षपदाच्या वाटपाचा एक फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.
यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गोकुळचे संचालकपद सव्वा-सव्वा वर्षासाठी वाटून घेतले जाईल. त्यामुळे पाच वर्षात तीन किंवा चार अध्यक्षांची नियुक्ती होऊ शकते, अशा फॉर्म्युला महायुतीच्या बैठकीत निश्चित झाल्याचे समजते. तसेच गोकुळचे अध्यक्षपद सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेस, मग भाजप आणि शेवटी शिवसेनेला मिळेल, अशी माहिती आहे. उर्वरित कालावधी जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष होणार आहे. मात्र, आज समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, महायुतीकडून गोकुळचे पहिल्यांदा अध्यक्षपद घेण्यासाठी अनेकांची नकारघंटा आहे. महायुती विरोधातील वातावरणामुळे तिन्ही पक्षांकडून अध्यक्षपद टाळण्याचा प्रयत्न होत आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रणजीतसिंह पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. रणजीतसिंह पाटील हे माजी आमदार के.पी. पाटील यांचे सुपुत्र आहेत. रणजीत पाटील यांच्यासह माजी आमदार राजेश पाटील यांचे नावदेखील चर्चेत आहे. याशिवाय, कालपर्यंत शिंदे सेनेच्या अजित नरके यांच्या नावाची गोकुळच्या अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा होती. तर भाजपकडून अंबरीष घाटगे, डॉ. चेतन नरके यांच्या नावाची चर्चा आहे. तर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडून शशिकांत चुयेकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी अगोदरच जाहीर करण्यात आले होते.
आज शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात अध्यक्षाची निवड केली जाईल. निवडून आलेले एकूण 25 संचालक आणि चार शासन नियुक्त संचालक असे 29 जण आज मतदान करतील. या निवडणुकीत चार शासन नियुक्त संचालक वेगळ्या मतपेटीत मतदान करतील. या मतदान प्रक्रियेचे छायाचित्रण केले जाणार आहे. त्यानिमित्ताने शिरगाव येथील गोकुळच्या कार्यालयाच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. यावेळी महायुती आणि मविआ दोन्ही बाजूचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. समविचारी आणि महायुती समर्थकांना पोलिसांनी वेगळ्या जागा नेमून दिल्या आहेत.




