अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
केडगाव देवी मंदिरात लहान मुलाच्या गळयातील सोन्यांची चेन चोरणार्या दोन महिलांना पोलीस व नागरिकांनी केडगाव वेशीजवळ पकडले. ही घटना 18 रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. कविता भोसले (वय 30, रा. भानसहिवरे, ता. नेवासा), शिवकन्या विशाल भोसले (वय 19, रा. भानसहिवरे, ता. नेवासा) अशी या महिलांची नावे आहेत.
याप्रकरणी हवालदार सचिन लोळगे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार लोळगे, रवी टकले, खताडे, लहारे, तानाजी पवार हे नवरात्री उत्सवानिमित्त केडगाव देवी परिसरात गस्त घालत असताना कमानीजवळ मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी एका महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्याने पोलीस तेथे गेले. चौकशी केली असता, सविता वीरकर (रा. केडगाव) व त्यांचा लहान मुलगा सार्थक दर्शनासाठी आले होते. सार्थकच्या गळ्यातील सोन्याची चेन दोन महिलांनी चोरली आहे.
एक महिला लाल रंगाची साडी घातलेली असून दुसरीने पंजाबी ड्रेस घातला आहे. या महिला केडगाव वेशीकडे जात आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेतला. त्या दोन्ही महिला वीरकर यांना दाखविल्या असता, लाल रंगाची साडी घातलेल्या महिलेने चेन पंजाबी ड्रेस घातलेल्या महिलेकडे देताना मी पाहिले. त्यावेळी त्या दोन्ही महिला केडगाव वेशीकडे घाईघाईत पळत सुटल्या. मी आरडाओरड केल्याने लोक जमा झाले. त्या महिलांना थांबवून पोलीस अंमलदार शेंडगे यांनी त्या महिलांची नावे विचारून चेन सुरक्षितपणे वीरकर यांच्याकडे सुपूर्द केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.