नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi
जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत शिवा नरवाल आणि इशा सिंग यांनी भारताला 10 मीटर एअर पिस्तुल मिश्र गटात सुवर्णपदक जिंकून दिले. या गटात भारताने जिंकलेले हे पहिलेच सुवर्ण ठरले. त्यांनी फायनलमध्ये टर्कीच्या खेळाडूंचा 16-10 असा पराभव केला.
बाकू येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील भारताचे हे आजच्या दिवसातील दुसरे पदक ठरले. शिवा, सरबज्योत सिंग आणि अर्जुन सिंग चिमा यांनी 10 मीटर एअर पिस्तुल पुरुष सांघिक प्रकारात कांस्यपदकाची कमाई करून भारताचे खाते उघडले होते. 18 वर्षीय इशा ही हैदराबादची आहे आणि 2018मध्ये तिने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकाराचे राष्ट्रीय जेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2019मध्ये तिने ज्युनियर वर्ल्ड कप (जर्मनी)स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. त्यापाठोपाठ आशियाई ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल आणि 10 मीटर एअर मिश्र सांघिक गटात तिने सुवर्णपदक जिंकून विक्रमी कामगिरी केली.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
17 वर्षीय शिवाचा प्रवास प्रेरणादायी आहे. भाऊ मनिश नरवालने 2021च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले अन् त्यातून प्रेरित होत शिवाने नेमबाजी करण्यास सुरूवात केली. 2020 आणि 2021 च्या खेलो इंडिया स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. मागील वर्षी त्याने इजिप्त येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत सीनियर गटात पदार्पण केले आणि पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट थोडक्यात हुकले होते.