मुंबई | mumbai
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार येताच जगभरातील बाजारात उलथापालथ सुरू आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जगानेच नाही तर जागतिक बाजाराने पण धसका घेतला आहे. सोने-चांदीचे भाव वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदीच्या दराने विक्रमी उंचांकी गाठली आहे. सराफ बाजाराच्या इतिहासात सोन्याचे विक्रमी दर पाहायला मिळत आहे.
जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सराफा बाजाराच्या इतिहासात सोन्याचे विक्रमी दर पाहायला मिळत आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटी सह ८८ हजार ४७५ रुपयांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर जीएसटीसह ९९ हजार ९१० रुपयांवर पोहोचले आहे.
जगातील दोन देशांमधील युध्दाचा तणाव, ट्रम्प यांचे नवीन धोरण, फेडरल बँकेने कायम ठेवलेले व्याजदर याचसोबत रुपयाचे घसरलेले मुल्य आहे. त्यामुळे सोने-चांदीचे दर वाढले आहेत. सोन्याचे दर ९० हजारांच्या उंबरठ्यावर आहे तर चांदीचे दर १ लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मुंबईतील जव्हेरी बाजारात सोन्याच्या भावात २,४३० रुपयांची उसळी दिसून आली. २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा घाऊक भाव सोमवारी ८५,६६५ रुपये प्रति १० ग्रॅमवर इतका होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. जागतिक धातू वायदा बाजारात‘कॉमेक्स’वर सोन्याचा भाव प्रति औंस ४५ डॉलरने वाढून २,९३२ डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे.
सोन्याचा भावात वाढ का होतेय?
सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामागे अनेक भू-राजकीय कारणे आहेत. ट्रम्प यांचे पुनरागमन, ट्रम्प यांचे अस्थिर व्यापार धोरणे, व्यापारी शस्त्र म्हणून शुल्काचा वापर, हमास-इस्रायल युद्ध, युक्रेन-रशिया युद्ध, साथीच्या रोग येण्याची भीती यामुळे अनेक देशांच्या बँका सोन्याचा साठा करून ठेवत आहेत. २०२५ सालाचे देखील ४० दिवस लोटले आहेत. या काळात देखील सोन्याच्या मागणीत १० टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच सोन्याची किंमतही कमालीची वाढली आहे. यावरून जगाला ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरच्या संकटाचा धोका जाणवू लागल्याचे दिसत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा