मुंबई । Mumbai
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गगनाला भिडणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरांना आज अचानक मोठा ब्रेक लागला आहे. जागतिक बाजारातील अनपेक्षित घडामोडींमुळे देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दराने तर आज थेट ‘गटांगळी’ खाल्ली असून प्रति किलोमागे तब्बल ५,००० रुपयांची घसरण झाली आहे, तर सोन्याचे दरही ७०० रुपयांनी घसरले आहेत. ऐन लग्नसराईच्या आणि सणासुदीच्या काळात झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, बाजारात खरेदीदारांची गर्दी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सराफा बाजारातून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, आज झालेल्या कपातीनंतर प्रति तोळा सोन्याचा मूळ भाव १,५६,००० रुपयांवर आला आहे. मात्र, यावर ३% जीएसटी (GST) लागू झाल्यानंतर ग्राहकांना प्रत्यक्ष खरेदीसाठी १,६०,६८० रुपये मोजावे लागत आहेत. व्यावसायिक आणि तज्ज्ञांच्या मते, सकाळी ११.३० वाजेपर्यंत बाजारात आणखी काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली होती, ज्यामुळे बाजारात काहीसा संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही पाहायला मिळाली.
गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी आज चांदीच्या दरातील घसरण सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. एकाच दिवसात ५,००० रुपयांची कपात झाल्यामुळे आज चांदीचा प्रति किलोचा दर २,६८,००० रुपयांवर स्थिरावला आहे. जीएसटीसह (३% GST) हा दर २,७’६,४०० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात झालेली ही मोठी घसरण गुंतवणूकदारांसाठी खरेदीची उत्तम संधी मानली जात आहे.
सराफा असोसिएशनच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या घसरणीचे मुख्य मूळ आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत आहे. जागतिक पातळीवर डॉलरच्या मूल्यात सातत्याने होणारे बदल आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. सध्या जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाल्याने सोन्या-चांदीची विक्री वाढली आहे, परिणामी पुरवठा वाढून किमती खालावल्या आहेत.
“आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी-पुरवठ्यातील चढ-उतार आणि भू-राजकीय घडामोडींमुळे आगामी काळातही सोन्या-चांदीच्या दरांमध्ये अशीच अस्थिरता किंवा चढ-उतार कायम राहू शकतात.” जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा किंवा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. स्थानिक बाजारातील अचूक दरांसाठी ग्राहकांनी आपल्या जवळच्या अधिकृत सराफा व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




