भारतातली बहुतांश शेती ही मोसमी पावसावर अवलंबून आहे. चांगला पाऊस येणार असे समजले, तरी शेतकरी आणि देशातील राजकारण्यांसह रिझर्व्ह बँकेलाही सुटकेचा नि:श्वास टाकावासा वाटतो. पावसाचा ढोबळ अंदाज बरोबर येतो; परंतु भौगोलिक विविधतेमुळे देशात पावसाचे प्रमाण सर्वत्र सारखे नसते. त्यामुळे त्याबाबतची अचूकता अंदाजात येत नाही. परिणामी, आनंदवार्तेमुळे लगेच हुरळून जाता येत नाही.
जगभर हवामानाचा अंदाज देणार्या विविध संस्था कार्यरत आहेत. नोमुरा, स्कायमेट, ऑस्ट्रेलियाचा हवामान विभाग आदी संस्थांनी भारतीय हवामान विभागापुढे आव्हाने उभी केली आहेत. जगातल्या अनेक देशांमध्ये हवामानाचे आणि पावसाचे अचूक अंदाज दिले जातात. भारतातही ‘स्कायमेट’सारख्या संस्थांच्या प्रवेशामुळे आता हवामानाचा अंदाज वारंवार द्यायला सुरुवात झाली असली तरी त्यात अजून अचूकता येत नाही. भारताचे व्यापक क्षेत्र, इथली विविधांगी भौगोलिक परिस्थिती आणि उष्ण कटिबंधातला भारताचा समावेश यामुळे अचूक अंदाज देण्यात अडचणी येतात, असे सांगितले जात असले तरी अमेरिकेसह अन्य देश उष्ण कटिबंधात येत असूनही तिथे मात्र अचूक अंदाज दिला जातो. त्याचे कारण तिथे शास्त्रज्ञांचा अभ्यास, त्यांना उपलब्ध असलेले तंत्रज्ञान आणि अचूक अंदाज दिला नाही तर प्रसंगी शिक्षा करण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे तिथे अचूक आणि विश्वासार्ह अंदाज दिले जातात. भारतात मात्र तसे नाही. असे असले, तरी एक बरे आहे. सुखावणार्या अंदाजामुळे जगण्याची उमेद वाढते.
‘स्कायमेट’ या संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार देशात सलग चौथ्या वर्षी पाऊस सर्वसाधारण म्हणजे सरासरीइतका असेल. अर्थात हा प्राथमिक अंदाज आहे. ‘स्कायमेट’ने अंदाज व्यक्त केला असला, तरी भारतीय हवामानशास्त्र विभागाने अजून काहीच जाहीर केलेले नाही. स्कायमेटच्या दुसर्या आणि सुधारित अंदाजाची आणखी दोन महिने वाट पहावी लागणार आहे. तोपर्यंत हवामानात काही बदल झाले तर त्यानुसार अंदाजातही काही बदल संभवतो. पावसाच्या अंदाजावर परिणाम करणारे जसे स्थानिक घटक असतात, तसेच आंतरराष्ट्रीय घटकही असतात. त्यामुळे बर्याचदा नंतर अंदाजात बदल होतो. स्कायमेटने जाहीर केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय प्रदेशात तापमानातला बदल कमी होत आहे. प्रशांत महासागरात उष्णतेकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता नाही. प्रशांत महासागराच्या या तापमानाचा अर्थ असा की यंदा ‘ला निना’मध्ये खंड पडू शकतो.
स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा देशभरात सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. सरासरी ही गेल्या अनेक दशकांच्या पाऊसमानाच्या रेकॉर्डवरून काढलेली असते. 2020 आणि 2021 ही सलग दोन वर्षं ‘ला निना’चा प्रभाव राहिला. त्यामुळे 2022 मध्ये हा प्रभाव जाणवण्याची शक्यता संख्याशास्त्रीयदृष्ट्या तरी दिसत नाही. इंडियन ओशियन डायपोल (आयओडी) आणि अल निनो सदर्न ऑसिलेशन्स (ईएनएसओ) भारतीय मॉन्सूनवर प्रचंड मोठा प्रभाव टाकत असतात. ‘स्कायमेट’च्या मते एप्रिलपर्यंत इंडियन ओशन डायपोल आणि अल निनो सदर्न ऑसिलेशन्स यांचा एकमेकांशी येणारा संबंध स्पष्ट होणार नाही. या दोन घटकांवरच भारतीय मान्सूनचे आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे येत्या एप्रिलपर्यंत चित्र अधिक स्पष्ट होईल. त्याच वेळी भारतीय हवामानशास्त्र विभागाकडूनही मान्सूनचा अंदाज दिला जाईल.
दर वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात पावसाळा असतो. 2021 मध्येही मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सलग चौथ्या वर्षी देशात पाऊस चांगला राहण्याचा हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेटचा अंदाज सकारात्मक असला तरी पूर्ण पावसाच्या अंदाजासाठी थोडे थांबावे लागेल. यंदा पावसाची चांगली सुरुवात होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला मरठावाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने ओढ दिली होती.
यंदा मात्र, तसे होणार नसल्याचे सांगितले जाते. गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यासह विदर्भात पश्चिमेच्या मोसमी वार्यांऐवजी पूर्वेकडील मोसमी वार्यांमुळे पाऊस पडत असल्याचा अनुभव आहे. 2021 मध्ये देशात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकर्यांना चांगली पिके घेता आली; परंतु महाराष्ट्रात वारंवार आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले. देशात कधी नव्हे एवढे, म्हणजे 31 कोटी टनांहून अधिक अन्नधान्याचे उत्पादन झाले आहे. तेलबियांसह अन्य उत्पादनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे अन्नधान्याची महागाई आटोक्यात राहिली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावरही या अनुकूल स्थितीचा परिणाम झाला.
आपल्याकडचा हवामान अंदाज दीर्घ मुदतीचा आणि दीर्घ भूभागाचा असतो. त्यातून काढलेली सरासरी सर्रास उपयोगाची नसते. आपल्याकडील संस्थांना छोटा भूभाग आणि छोट्या मुदतीचा हवामानाचा अंदाज सांगता येत नाही. उलट, सध्याच्या हवामानबदलाच्या काळात स्थानिक पातळीवर हवामानाचा अंदाज देण्याची गरज आहे. अमेरिका, सिंगापूर या देशांमध्ये 12 वाजता सांगितले जाते की, आज दोन वाजता पाऊस पडेल आणि तसा तो पडतो देखील. कारण या देशांमध्ये हवामानाचा अंदाज सांगण्याचे शास्त्र प्रगत आहे.
त्यामुळे आपल्याकडे हवामानाचा अचूक अंदाज करु शकणार्या मॉडेलची गरज आहे. भारतात सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडेल असे सांगत असताना ठराविक जिल्ह्यात नेमका किती पाऊस पडेल, हे सांगितले जात नाही. त्यामुळे सामान्य शेतकर्याने या अंदाजाचे विश्लेषण कसे करायचे हा प्रश्न उरतो. यंदा देशात चांगला पाऊस पडेल, सरासरीइतका पाऊस पडेल इतकीच माहिती अंदाजातून मिळते; पण एखादा शेतकरी सोयाबीन उत्पादक असेल तर त्याच्या पट्ट्यात नेमका किती आणि कधी पाऊस पडेल हे या अंदाजात सांगितले जात नाही. यामुळे मग शेतकर्यांमध्ये हवामान अंदाजांविषयी संभ्रम असतो.
हवामान विभाग देशासाठी पूर्वानुमान जाहीर करतो तेव्हा त्यात मध्य भारत, ईशान्य भारत, वायव्य भारत आणि दक्षिण भारत असे भाग गृहित धरले जातात. देशपातळीवरील हवामानाचा अंदाज सांगताना अशी टक्केवारी सांगितली जाते; पण फक्त एका प्रांतासाठी पूर्वानुमान द्यायचे म्हटले की टक्केवारीमधली त्रुटी 15 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढते. महाराष्ट्राच्या बाबतीत ही त्रुटी 25 ते 30 टक्के आली तर एवढ्या मोठ्या त्रुटीसहितच्या अंदाजाचा काय फायदा, असा प्रश्न पडतो. जिल्हास्तरावरील अंदाज सांगा, असेही लोक म्हणतात; पण सद्यस्थितीत ते अशक्य आहे, असे भारतीय हवामान विभागाचं म्हणणं आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही 80 ते 90 टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
यामुळे शेती आणि शेतीवर आधारित उद्योगांना आपले नियोजन करण्यासाठी फायदा होतो. हवामान सतत बदलत असते. त्यामुळे आताच्या वायूमंडळाच्या स्थितीच्या आधारे पुढच्या चार-पाच महिन्यांचा अंदाज व्यक्त करता येत असतो पण त्यात बदल संभवतो. म्हणूनच देशभरात जिल्हा स्तरावर भारतीय हवामान विभागाची केंद्रं स्थापन करायला हवीत. या केंद्रांमधून वर्षभर त्या भागातला पाऊस, तापमान आणि आर्द्रता याविषयीची माहिती द्यायला हवी. यामुळे स्थानिक शेतकरी वर्गाला लाभ मिळेल. स्थानिक पातळीवर हवामानाचा जितका अंदाज सांगितला जाईल, तितके ते परिसरातल्या लोकांच्या फायद्याचे राहिल.