Monday, November 25, 2024
HomeराजकीयTrumpet Symbol : पवारांसाठी गुड न्यूज! ‘तुतारी’ चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Trumpet Symbol : पवारांसाठी गुड न्यूज! ‘तुतारी’ चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई । Mumbai

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

- Advertisement -

यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने ‘ट्रम्पेट’ चिन्हाचं ‘तुतारी’ हे मराठी भाषांतर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाचं नाव मात्र तुतारी वाजवणारा माणूस हे कायम ठेवले आहे.

मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं. लोकसभा निवडणुकीत राज्यातील अपक्ष उमेदवारांनी ट्रम्पेट हे चिन्ह घेऊन लढले या चिन्हाच मराठीमध्ये भाषांतर तुतारी असं केलं होतं. काही लोकसभा मतदारसंघात हजारोंच्या संख्येने या ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे असलेल्या उमेदवारांना मिळाली. सातारा लोकसभेत याचा मोठा फटका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बसला होता. यामुळे शरद पवार यांच्या पक्षाने राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली होती. यावरुन राज्याचे निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आता राज्यातील अधिकाऱ्यांना नवीन आदेश दिले आहे.

निवडणूक आयोगाने काय म्हटलं आहे?

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 26 मार्च, 2024 रोजी निर्गमित केलेल्या मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्य स्तरीय पक्षांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यासाठीच्या राज्यस्तरीय पक्षांच्या यादीमध्ये “नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार” या पक्षाचा समावेश केला असून सदर पक्षाला “Man Blowing Turha” हे चिन्ह वाटप केलेले आहे. सदर चिन्हांचे मराठी भाषांतर या कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या निवडणूक चिन्हांच्या तक्त्यामध्ये “तुतारी वाजविणारा माणूस” असे नमूद करण्यात आलेले आहे. दोन्ही चिन्हांमध्ये असलेल्या तुतारी या नाम सार्धम्यामुळे/समान उच्चारामुळे (Phonetic overlap) प्रचारा दरम्यान मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येतो, सबब, मुक्त चिन्ह असलेल्या “Trumpet” या चिन्हांचे मराठी भाषांतर तुतारी असे वापरण्यात येऊ नये अशी विनंती नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या पक्षाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे केली होती, ही विनंती निवडणूक आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे.

वस्तुस्थिती विचारात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीमधील “Trumpet” या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरण “तुतारी” ऐवजी “ट्रम्पेट” असे सुधारित करण्यात येत आहे. यासंदर्भातील सुधारित निवडणूक चिन्हांचा तक्त्ता PDF मंध्ये आपणास उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 संदर्भातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करतेवळी व अन्य आवश्यक प्रयोजनासाठी सुधारीत तक्त्यामध्ये नमूद केल्यानुसार “Trumpet” या मुक्त चिन्हाचे मराठी नाव “तुतारी ऐवजी “ट्रम्पेट” असे दर्शविण्यात यावे.

चिन्हाचे मराठी भाषांतरण करण्यासाठी तुतारी, पिपाणी, बिगुल याप्रमाणे अनेक समानार्थी शब्द उपलब्ध आहेत. मात्र यापैकी कोणताही एक शब्द वापरल्यास आणखी संभ्रामवस्था निर्माण होऊ शकते. याबाबत असेही नमूद करण्यात येते की, निवडणूक चिन्हांच्या तक्त्यातील काही निवडणूक चिन्हांना इंग्रजी नावाप्रमाणे मराठी नाव दर्शविण्यात आले आहे. उदा. एअर कंडिशनर, ऑटो रिक्शा, बॅट, बॅटरी टॉर्च, ब्रेड टोस्टर, ब्रश, ब्रीफकेस, केक, कॅलक्युलेटर, कॅमेरा, लॅपटॉप, हेडफोन, हेलमेट, टेबल इत्यादी, असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या