Friday, July 24, 2026
Homeक्राईमAhilyanagar : गोपाळपूरच्या विवाहितेचा मारहाणीत मृत्यू

Ahilyanagar : गोपाळपूरच्या विवाहितेचा मारहाणीत मृत्यू

पतीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल || पाच दिवसांची पोलीस कोठडीे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नेवासा तालुक्यातील गोपाळपूर येथे विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने अखेर खुनाचे रूप घेतले असून शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पतीविरूध्द नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना संतोष वडागळे (वय 30) असे मयत महिलेचे नाव आहे. संतोष संभाजी वडागळे (रा. गोपाळपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची (23 फेब्रुवारीपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात मयत वंदना यांचा भाऊ अजित उत्तम शिंदे (वय 27, रा. निंबोडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी बुधवारी (18 फेब्रुवारी) पहाटे फिर्याद दिली आहे. सोमवारी (16 फेब्रुवारी) रात्री वंदनाला नेवासा फाटा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक पाहणीत तिच्या शरीरावर कपाळ, भुवई, गळा, हात, पाठ, पाय व पोटावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. तरीदेखील पती संतोष वडागळे याने शवविच्छेदन न करता थेट अंत्यविधीची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली. याची खबर मिळताच नेवासा पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत मृतदेह अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. मंगळवारी (17 फेब्रुवारी) सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजित शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, मे 2023 मध्ये आळंदी येथे वंदनाचा संतोष वडागळे याच्याशी विवाह झाला होता. जानेवारी 2026 मध्ये वंदनाला जुळे अपत्य झाले होते. लग्नानंतर संतोष वडागळे हा वंदनाला वारंवार शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये वंदनाने मारहाणीची माहिती भावाला दिली होती. त्यानंतर तिला माहेरी आणण्यात आले होते. जून 2024 मध्ये लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे व्रणही तिने भावाला दाखविल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. प्रत्येक वेळी संतोषने माफी मागून पुन्हा त्रास देणार नसल्याचे आश्वासन दिल्याने तिला सासरी पाठविण्यात आले होते.

16 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नेवासा पोलिसांकडून वंदनाच्या मृत्यूची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. नातेवाईकांनी ग्रामीण रूग्णालयात मृतदेह पाहिल्यानंतर गंभीर मारहाणीच्या जखमा दिसल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह अहिल्यानगर येथे हलविण्यात आला. शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे सांगितल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

पती रागीट; चारित्र्यावर संशय
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संतोष वडागळे हा रागीट स्वभावाचा असून किरकोळ कारणावरून वंदनाच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करीत असे. यासंदर्भात वंदना यांनी नातेवाईकांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याच्यावर पूर्वी अवैध दारू विक्रीप्रकरणी कारवाई झाल्याचीही माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नेवासा पोलिसांनी संतोष वडागळे याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...