अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत येथील औषध प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालयातून औषधी नमुने घेऊन बनावट औषधे आहेत की नाही, याची पडताळणी केली जणार आहे. एका महिन्यात 30 याप्रमाणे पुढील तीन महिन्यांत 90 नमुने घेऊन ते तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, औषधे अप्रमाणित आढळून आल्यास संबंधित कंपनी व पुरवठादार यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सहायक आयुक्त अशोक बर्डे यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपूर्वी राज्यभरातील शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा प्रकार समोर आल्यामुळे सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयातील औषधांची तपासणी करून त्याचे नमुने घेण्याचे आदेश औषध प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरात राबविलेल्या 100 दिवशीय विशेष कार्यक्रमांतर्गत औषध प्रशासनाने शासकीय व निमशाासकीय रुग्णालयातील औषधांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात सुमारे 90 नमुने घेतले जाणार आहेत. येथील औषध प्रशासनाकडे मनुष्यबळ कमी आहे. या मोहिमेत तीन निरीक्षक काम करणार आहेत.
प्रत्येक निरीक्षकाने एक महिनात 10 नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवायचे आहेत. त्यांच्याकडून जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व मनपाचा आरोग्य विभागातून पुरवठा होत असलेल्या औषध भंडार मध्ये तपासणी करून तेथूनही नमुने घेतली जाणार आहेत. या ठिकाणाहून जिल्हाभरात औषधांचा पुरवठा केला जात असतो. तसेच जिल्ह्यातील दोन ठिकाणी अॅलोपॅथीक औषध निर्माण करणार्या कंपन्या आहेत. तेथेही तपासणी केली जाणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील रक्तपेढीला भेटी दिल्या जाणार असून तेथील आवश्यक ती तपासणी औषध प्रशासनाकडून केली जाणार आहे. शासकीय व निमशासकीय रुग्णालयात विविध कंपन्यांचे औषधांचा पुरवठा केला जातो. ती औषधे अप्रमाणित असल्याची प्रकरणे राज्यभरात समोर आली होती. त्यामुळे औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अप्रमाणित आढळल्यास कारवाई
औषध निरीक्षकांकडून अचानकपणे तपासणी करून औषधांचे नमुने घेतले जाणार आहेत. ते नमुने छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. त्यांना देखील याचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. औषधे अप्रमाणित आढळून आल्यास संबंधित औषध कंपनी व पुरवठादार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.