दिल्ली । Delhi
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट केलंय. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या अमानुष घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
या हल्ल्यानंतर देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व वृत्तवाहिन्या आणि मीडिया संस्थांना आदेश दिले आहेत की, पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून सुरू असलेल्या कारवायांचे रिअल टाईम कव्हरेज करू नये. सरकारने स्पष्ट केलं आहे की, रिअल टाईम माहिती प्रसारित केल्याने राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे माध्यमांनी अधिक जबाबदारीने वर्तणूक करावी, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, सर्व वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य द्यावे. त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर योग्य आणि जबाबदारीने करावा. सुरक्षा संबंधित बातम्यांचे वृत्तांकन करताना सर्व नियम आणि कायद्यांचे पालन करणे बंधनकारक आहे, असेही निर्देश देण्यात आले आहेत. कोणतीही संवेदनशील माहिती तात्काळ प्रसारित केल्याने कारवायांवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि सुरक्षा दलांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते.
सरकारच्या आदेशानुसार, मीडिया संस्थांनी व्हिज्युअल्स वापरून आणि अधिकृत स्त्रोतांद्वारे माहिती देण्यावर भर द्यावा. थेट कारवायांचे चित्रीकरण किंवा थेट प्रक्षेपण टाळावे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाच्या उल्लंघन केल्यास संबंधित वृत्तसंस्था किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई होऊ शकते, असा इशाराही सरकारने दिला आहे.