Saturday, July 27, 2024
Homeनगरशासकीय योजनांबाबत अधिकार्‍यांनी अभिनव प्रयोग राबवावेत- आ. कानडे

शासकीय योजनांबाबत अधिकार्‍यांनी अभिनव प्रयोग राबवावेत- आ. कानडे

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

शासन चांगले निर्णय घेते पण त्याची अंमलबजावणी नीटपणे होत नाही, त्यामुळे शासन आपल्या दारी यासारखे उपक्रम राबवावे लागत असून अधिकार्‍यांनी लोकसेवक म्हणून जाणीवपूर्वक ज्यांच्यासाठी योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्या लाभार्थींना देण्यासाठी अभिनव प्रयोग राबवावेत, असे आवाहन आ. लहू कानडे यांनी केले.

- Advertisement -

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित कर्मचारी अधिकारी यांच्या संख्येपेक्षाही 32 गावांतील गरजू लाभार्थ्यांची संख्या अत्यंत कमी होती. शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची’ हे अभियान राबविण्याचे शासनाने ठरविले. शासन आपल्या दारी या नावाने गाजावाजाही झाला पण प्रत्यक्षात लाभार्थ्यांपर्यंत सरकारी यंत्रणा पोहचलीच नसल्याचे देवळाली प्रवरा येथे श्रीरामपूर मतदारसंघातील 32 गावांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आढळून आले. त्याबद्दल आ. कानडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी आ. कानडे म्हणाले की, शासन आपल्या दारी या पद्धतीच्या अंमलबजावणीमुळे गरिबांची आपण केवळ थट्टा करतो की काय, असा प्रश्न मला पडला आहे. वास्तविक प्रत्येक शासकीय विभागातील राबवित असलेल्या कल्याणकारी योजनेचे नाव त्यासाठी पात्रता लाभाचे स्वरूप व नागरिकांनी द्यावयाची कागदपत्रे याची माहिती प्रत्येक ग्रामपंचायत तलाठी कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी द्यायला हवी. त्यानुसारच गावातील कोणत्या कुटुंबांना कोणत्या योजनेचा लाभ घेता येईल हे समजेल.

त्याशिवाय रेशन कार्ड, निराधारांना सहाय्य योजना, शेतावर जाण्यासाठी रस्ता देण्याची प्रकरणे, घरकुले यांचा गावनिहाय प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन गावातील कारभार्‍यांना सहभागी करून हे अभियान लोकचळवळ बनायला हवी, अशी कोणतीच कृती न करता एकाच दिवशी कार्यक्रम आयोजित करून केवळ कागदोपत्री अभियान राबवणे म्हणजे केवळ कर्मकांड पार पाडणे आहे. जनतेमध्ये जाऊन गावोगाव प्रचार आणि प्रसिद्धी करून शिबीर भरवले असते तर येथे जागा पुरली नसती.

पण 32 गावांसाठी कार्यक्रम असताना वीस पंचवीसही नागरिक उपस्थित नाहीत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे दि. 5 जूनपासून राहुरी तालुक्यातील रामपूरपासून ते पूर्वेकडील तिळापूर पर्यंत प्रत्येक दिवशी केवळ दोन गावांमध्ये शिबीर या पद्धतीने नियोजन करावे, या प्रत्येक गावामध्ये मी स्वतः उपस्थित राहील. परंतु चांगल्या योजनेचा अशा पद्धतीने बट्ट्याबोळ होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी प्रास्ताविक केले. देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केले. यावेळी गट विकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, राहुरी तालुकाप्रमुख सुनील कराळे, मुसळवाडीचे अमृत धुमाळ, टाकळीमियाचे अ‍ॅड. रावसाहेब करपे, अजय खिलारी, दीपक पठारे आदींसह नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, नगरपरिषदेच्या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या