गावागावांत, वस्तीवस्तीवर सुरू असणार्या सरकारी शाळांमध्ये अनेक प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात. बोलीभाषेचे जतन करण्यासाठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. सरकारी शाळांमधून स्थानिक बोलीभाषा जोपासण्याचे प्रयत्न होतात. ग्रामीण, आदिवासी, डोंगराळ भागातील शाळा म्हणजे केवळ अध्ययन-अध्यापनाची केंद्रे नाहीत तर भाषा विकासाची केंद्रे आहेत हे लक्षात घ्यायला हवे.
आपण जेव्हा स्वभाषा जगवायची आणि समृद्ध करायची असे म्हणतो तेव्हा त्या भाषेतील शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावत असते. मुलांच्या भविष्याची वाट ही जशी शिक्षणातून निर्माण होत असते तसे भाषेसाठीचा प्रवासही संबंधित भाषेच्या माध्यमांच्या शाळेतून होत असतो. बालकांचे शिक्षण सुरू असताना भाषा हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. जेव्हा मुले शाळेत येतात तेव्हा विद्यार्थ्यी गरजेपुरती संवादाची भाषा शिकलेले असतात. मात्र भविष्याच्या दृष्टीने संवाद अधिक समृद्ध करण्यासाठी पुरेशा प्रमाणात भाषा विकसित झालेली नसते. त्यासाठीची जबाबदारी शाळांची असते. आपण कोणताही विषय शिकणार असलो आणि भविष्यात कोणतीही शाखा निवडणार असलो तरी त्याचा पाया हा मातृभाषा शिक्षणातून घातला जात असतो. शिक्षणातून ज्या मुलांची भाषा समृद्ध होत जाते त्या मुलांचे शिक्षण अधिक परिणामकारक होण्यास मदत होते. भाषा समृद्ध करण्यासाठी केवळ शिक्षक पुरेसे नाहीत तर त्यापलीकडे जाऊन शाळांमध्ये सुविधाही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शाळांमध्ये होणारे उपक्रम, कृती, प्रयोग, प्रात्यक्षिके, ग्रंथालय, पुस्तकपेढी, शाळांच्या बोलक्या भिंती या त्यापैकी काही. मुलांची भाषा समृद्ध करत तिचे लोकव्यवहारात उपयोजन करण्याच्या दृष्टीने मराठी माध्यमाच्या अर्थात सरकारी शाळा जितक्या समृद्ध होतील तितक्या वेगाने आपल्या स्थानिक भाषा विकसित होत जातील. या शाळा खर्या अर्थाने बोली आणि मराठी जतन करणार्या संस्था आहेत. शिक्षण स्मार्ट करताना शाळांमधून भाषा विकसनाचे प्रयत्नही म्हणूनच अधिक महत्त्वाचे ठरतात.
मराठी भाषेविषयीची चिंता गेले अनेक दशके व्यक्त होते आहे. तरीसुद्धा आपली मराठी भाषा का संपली नाही? वर्तमानात कदाचित मराठी शाळांची संख्या कमी झाल्याचे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या उंचावल्याचे बोलले जाते. मराठी बोलणार्या मुलांचा मराठीतील संवाद कमी झाला आहे. मात्र तरीसुद्धा गावागावांत, वस्तीवस्तीवर सुरू असणार्या सरकारी शाळांमध्ये अनेक प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात. बोलीभाषेचे जतन करण्यासाठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कोणतेही मूल शाळेत प्रवेशित होते तेव्हा ते स्वतःसोबत ज्या काही गोष्टी आणते त्यात त्याची स्वतःची भाषा असते. त्यात परिसर भाषाही असते. मात्र त्या भाषेपेक्षा शाळेचे माध्यम आणि पुस्तकांची भाषा भिन्न असते. शाळांमधील शिक्षक अशा तीन प्रकारच्या भाषा सोबत घेऊन त्यांच्याशी संवाद करतो. त्या तीनही भाषा सोबत चालत राहिल्या आणि शिक्षणात स्वीकारल्या गेल्या की भाषेतील अंतर कमी होते. त्याचबरोबर मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होण्यास त्यातून मदत होते. भाषेमुळे शाळांशी अधिक चांगल्यारीतीने जोडले जाणे घडते. शाळेत येताना मुले घरातील भाषा सोबत आणत असतात. त्यातून शाळेत विविध भाषांची देवाणघेवाण होत असते. शिक्षकांची भाषा मुलांच्या कानी जाते, मुलांची भाषा शिक्षकांच्या कानी येते. त्यातून घडणारी अनुभवांची अभिव्यक्ती आणि देवाणघेवाण मुलांना समृद्ध करणारी आहे.
मुले एकमेकांच्या भाषेतील शब्द सोबत घेऊन जातात. संवादात उपयोगात आणतात. सरकारी शाळांमधून स्थानिक बोलीभाषा जोपासण्याचा होणारा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद म्हणायला हवा. भाषा संवर्धनासाठी शाळांधून प्रयत्न होत असल्याने सरकारी शाळांना आधार देणे म्हणजे भाषा समृद्धतेसाठीचा प्रयत्न करणे आहे. त्यामुळे सरकारी शाळा टिकवण्याची नितांत गरज आहे. त्या टिकल्या तर विविध ठिकाणी बोलल्या जाणार्या बोलीभाषा संवादातून जिवंत राहण्यास मदत होणार आहे. भाषा मेली तरी त्या छोट्या छोट्या समूहाची संस्कृतीदेखील मरते. त्यामुळे आपल्या देशाची विविधता जपण्यासाठी सरकारी शाळांची भूमिका अधिक महत्त्वाच्या ठरतात.
सरकारी शाळांमध्ये जर वाचन संस्कार पुढे जायचा असेल तर या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाचनासाठी समृद्ध ग्रंथालये असायला हवी. अलीकडील शैक्षणिक संशोधनानुसार शाळास्तरावरील विद्यार्थ्यांचा आणि भाषेचा विचार करून वाचनस्तर निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी अनेक पुस्तके प्रकाशित होत आहेत. ही पुस्तके मोठ्या प्रमाणावर शाळांच्या ग्रंथालयात असायला हवीत. पुस्तकांसोबत चित्रदेखील भाषा विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. मुले चित्र वाचतात. त्यानंतर वर्णन करतात आणि मग त्यावर गप्पा मारतात. चित्रांचा हा प्रवास मुलांच्या भाषा विकासाला कितीतरी मदत करतो. आपल्या मनातील शब्दांना सोबत घेऊन, अनुभवाशी सांगड घालत मुले बोलत जातात. अनुभवातून होणारा भाषा विकास महत्त्वाचा आहे. शाळा स्मार्ट असायल्या हव्यात याचा अर्थ त्या अधिक बोलक्या असायला हव्यात. त्यातून त्यांच्या भावविश्वाशी जोडलेली चित्रे असतील तर मुलांच्या अभिव्यक्तीवर त्यांचा अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे या शाळांमध्ये समृद्ध ग्रंथालय आणि शाळांच्या भिंती अधिक बोलक्या असण्याची गरज आहे.
शाळांमध्ये येणार्या विद्यार्थ्यांच्या मदतीने शब्दकोष निर्मितीची शक्यता अधिक आहे. दर दहा कोसाला भाषा बदलते असे म्हटले जाते.प्रत्येक प्रांतात एखाद्या वस्तू, प्रक्रिया, संकल्पनेसाठी वेगवेगळे शब्द उपयोगात आणले जातात. त्यानुसार स्थानिक पातळीवर असे शब्द एकत्रित करून स्थानिक भाषा शब्दकोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील सुमारे 52 बोलीभाषा आहेत. त्या भाषांचे शब्दकोष सहजतेने विकसित करता येतील. शब्दकोष विकसित झाल्यास भाषा पुढच्या पिढीच्या हाती देण्यास मदत होत असते.शब्दकोष हे कोणत्याही भाषेचा महत्त्वाचा ठेवा आहे.आपण सरकारी शाळांच्या माध्यमातून या बोलींचा अधिकाधिक उपयोग करत तिचा स्वीकार करण्याची भूमिका घेतली आहे. आता स्थानिक भाषांमधील उत्तरे स्वीकारली जात असल्याने भाषेमुळे वाढलेले अंतर कमी होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या शाळा बळकट करणे म्हणजे स्थानिक भाषा जतन करणे आणि सक्षम करणे आहे. त्यातून बहुविध संस्कृतीचे आणि विविध समूहाच्या परंपरांचे जतन करणे आहे. ग्रामीण, आदिवासी, डोंगराळ भागातील शाळा म्हणजे केवळ अध्ययन-अध्यापनाची केंद्रे नाहीत तर भाषा विकासाची केंद्रे आहेत हे लक्षात घ्यायला हवे.
(लेखिका सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. )