राहाता | प्रतिनिधि
राहात्यात मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचा निषेध नोंदवत सकल मराठा समाज बांधवांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेस वर असणाऱ्या शासकीय जाहिरात फलका वरील पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर नेत्यांच्या तोंडाला काळे फासले व जोडे मारले त्यानंतर या सरकारचा निषेध नोंदवत मराठा आरक्षण प्रश्न लवकर निकाल द्या व जरांगे पाटलांच्या प्रकृतीची काळजी घ्या अन्यथा आंदोलन अधिक तीव्र व उग्र स्वरूपाचे केले जाईल भविष्यातील आंदोलन सरकारला झेपणार नाही व मराठा समाज बांधव सरकारची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला
सकाळी राहाता शहरातील व तालुक्यातील अनेक समाज बांधव ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिरासमोर एकत्रित जमा झाले. त्यानंतर पायी बसस्थानकाकडे चालत जात दिसेल त्या वेळी एसटीला थांबवत प्रत्येक एसटी वरील नेत्यांच्या तोंडाला काळे पासून त्या फ्लेक्स वर जोडे मारले. “एक मराठा, लाख मराठा”, “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं” असं म्हणत परिसर दुमदुमून ठेवला. यावेळी आरक्षण जर मिळालं नाही तर मराठा समाजाच्या तीव्र रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल. गेल्या पाच दिवसांपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसलेले आहे. सरकारने आता त्यांच्या उपोषणाचा व मराठा समाज बांधवांचा अंत पाहू नये, अन्यथा सरकारला खूप जड जाईल, सरकारला आमची मागणी आहे. आम्हाला कुणाच्याही हक्काचं अथवा कुणाच्या वाट्यातून आरक्षण नकोय, तर स्वतंत्र आरक्षण लवकर द्या आणि हा प्रश्न कायमचा मार्गी लावा. अन्यथा आज जर प्रश्न मार्गी लागला नाही सबंध राज्यभरात तसेच राहता तालुक्यात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून मराठा समाज सरकारला खाली केसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी अनेकांनी दिला.
राहाता शहर व तालुका बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नागरिक व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन बंद शंभर टक्के यशस्वी केला. सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने दिवसभर बंद ठेवून या मोर्चात पूर्णपणे सहभाग नोंदवला समाज बांधवांनी यावेळी सरकारचा व केंद्र सरकारचा निषेध नोंदवताना नेत्यांच्या विरोधात घोषणा देत आरक्षण लवकर द्या अन्यथा सरकारला भविष्यातील आंदोलने परवडणार नाही अथवा झेपणार नाही असा खणखणीत इशारा यावेळी समाज बांधवांनी दिला आहे. राहता शहरासह परिसरातील अनेक गावांनी आपले व्यवहार बंद ठेवून या आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक एसटी बसला थांबवून नेत्यांच्या फोटोला काळे फासले व जोडे मारले. यावेळी बसमधील प्रवाशांमध्ये थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु राहता शहरातील समाज बांधवांच्या वतीने अत्यंत शांततेत व कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेत आंदोलन केले गेले. आम्ही कुठल्याही प्रकारचे विध्वंसक आंदोलन सध्या करणार नाही मात्र जर सरकारने प्रश्न लगेच मार्गी लावला नाही आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाचा अंत पाहिला तर यापुढे सरकारला मराठा समाज माफ करणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.