Saturday, September 21, 2024
Homeनगरपदवीधर निवडणूक : पसंती क्रमांक 1 शिवाय मतपत्रिका ठरणार बाद

पदवीधर निवडणूक : पसंती क्रमांक 1 शिवाय मतपत्रिका ठरणार बाद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतदारांना मतदान करतांना मतपत्रिकेवरील उमेदवारांपैकी त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराच्या नावासमोर पसंती क्रमांक 1 लिहिणे बंधनकारक आहे. ज्या मतपत्रिकेवर पसंती क्रमांक 1 नमूद नसेल, ती मतपत्रिका बाद ठरणार आहे. प्रशासनातर्फे मतदान जागृती मोहिमेत ही बाब स्पष्ट केली गेली आहे. तसेच क्रमांक दोनपासूनचे पसंती क्रमांक लिहिण्याचे बंधन मतदारांवर नाही. असे पसंती क्रमांक लिहिणे ऐच्छिक असणार आहे, असेही स्पष्ट केले गेले आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या 30 जानेवारी रोजी होणार आहे. नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांच्या या मतदारसंघाच्या विधान परिषद लोकप्रतिनिधी साठीच्या या निवडणुकीत एकूण 2 लाख 62 हजार 731 मतदार आहेत. यात सर्वाधिक 1 लाख 15 हजारावर मतदार नगर जिल्ह्यात आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात 16 उमेदवार आहेत. यात अपक्ष उमेदवार प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे व महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या धुळ्याच्या शुभांगी पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे.

याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे रतन कचरु बनसोडे (नाशिक) व नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीचे सुरेश भीमराव पवार (नाशिक) तसेच आम आदमी पक्षाचा पाठिंबा असलेले ईश्वर उखा पाटील (धुळे) या तीन पक्षीय उमेदवारांसह अनिल शांताराम तेजा (नाशिक), अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर (धुळे), अविनाश महादू माळी (नंदूरबार), इरफान मो. इसहाक (मालेगाव, जि.नाशिक), बाळासाहेब रामनाथ घोरपडे (नाशिक), अ‍ॅड. जुबेर नासिर शेख (धुळे), अ‍ॅड.सुभाष राजाराम जंगले (श्रीरामपूर, नगर), नितीन नारायण सरोदे (नाशिक), पोपट सीताराम बनकर (नगर), सुभाष निवृत्ती चिंधे (नगर) व संजय एकनाथ माळी (जळगाव) असे 11 अपक्ष असे एकूण 16 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

यात नगर जिल्ह्यातील चार उमेदवारांचा समावेश आहे. या निवडणुकीतील प्रचार सर्वच उमेदवारांनी सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाने विधान परिषद पदवीधर निवडणुकीत मत कसे नोंदवावे, याचे मार्गदर्शन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या