Saturday, May 4, 2024
Homeनाशिकरोथे एर्ड कंपनीवर ग्रामपंचायतीने केला गुन्हा दाखल

रोथे एर्ड कंपनीवर ग्रामपंचायतीने केला गुन्हा दाखल

वाडीव-हे । Vadivarhe

इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे गोंदे औद्योगिक वसाहतीतील रोथे एर्ड या कंपनीने शासन आदेशाची पायमल्ली करून निष्काळजीपणा करत मोठ्या प्रमाणावर करोना आजार वाढीस कारणीभूत ठरली असल्याचे म्हणत वाडीव-हे ग्रामपंचायतीने या कंपनीवर वाडीव-हे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

शहरा बरोबरच ग्रामीण भागात देखील करोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येने मिळून येत असून इगतपुरी तालुक्यातही शहरी व ग्रामीण भागात या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाडीव-हे गोंदे औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्या लॉक डाउन उठल्यानंतर अटी व शर्थी ठेवून सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्याप्रमाणे कंपन्या सुरु झाल्या मात्र वाडीव-हे ग्रामपंचायत हद्दित असलेल्या “रोथे एर्ड “या कंपनीने कुठल्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्स न पाळता तसेच योग्य ती काळजी न घेता कंपनी सुरु केली. मात्र या कंपनीतुन शेकडो कामगार आणि त्यांचे कुटुंबिय करोना बाधित आढळून आले आहेत.

तसेच कंपनीतिल एक कामगाराचा बळी देखील गेला आहे. तर अनेक जण उपचार घेत आहेत.या सगळ्या परिस्थितीस कारणीभूत ठरल्याने तसेच शासन अदेशाची पायमल्ली केल्याने निष्काळजी पणाने लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे. यासर्व बाबीस कंपनी प्रशासन जबाबदार असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याबाबत वाडीव-हे ग्रामपंचायतने रोथे एर्ड कंपनी वर वाडीव-हे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी ईश्वर पाटिल, सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर आदि उपस्थित होते.

इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण मिळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती,प्रांत अधिकारी तेजस चव्हाण,तहसीलदार परमेश्वर कासुळे, गटविकास अधिकारी किरण जाधव वाडीव-हे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, मंडळ आधिकारी, तलाठी, गोंदे ग्रामपंचायत पदाधिकारी आदिंनी रोथे एर्ड कंपनीस तत्काळ भेट देवून कंपनी काही कालावधिसाठी बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्या आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले आहे.

वाडीव-हेत देखील आतापर्यंत २८ रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे वाडीव-हे गाव पुन्हा आठ दिवस अत्यावश्यक सेवा वगळून पूर्णता बंद ठेवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या