अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे| Ahilyanagar
जिल्ह्यातील 1 हजार 323 ग्रामपंचायतमधील ‘आपलं सरकार’ सेवा केंद्र कात टाकणार असून या ठिकाणी पूर्वीपेक्षा अधिक सेवा मिळणार आहेत. यासाठी आता सरकारच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या नावाने महाआयटीकडून यूजर आयडी मिळणार आहे. या आयडीवरून ग्रामविकासह राज्य सरकारच्या 38 योजनामधील 900 हून अधिक सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. पूर्वी महाआयटीचा हा पोर्टल आयडी ग्रामपंचायतींच्या ऑपरेटच्या नावाने मिळत होता, मात्र आता तो ग्रामपंचायतींच्या नावे मिळणार आहे.
राज्य सरकारच्या धोरणानुसार यापूर्वी महा-ईसेवा केंद्रातून तसेच सेतू सेंटरमधून नागरिकांना वेगवेगळ्या शासकीय दाखल्यांसह विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत होत्या.
याच धरतीवर आता जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमार्फत ग्रामविकाससह अन्य शासकीय विभागाच्या योजना आणि दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यादृष्टीने राज्य सरकार आणि महाआयटी विभागाच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला महाआयडीकडून स्वतंत्र युजर आयडी देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये सुरू असणार्या आपलं सेवा केंद्र या नव्या युजर आयडीमार्फत हे काम सुरू राहणार आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये मंजूर असणार्या आपलं सरकार पोर्टलवर जन्म, मृत्यूसह अन्य सात प्रकारचे दाखले देण्यात येत होते. मात्र हे काम आता वाढविण्यात येणार आहे. तसेच खाजगी आपलं सरकार केंद्र आणि सेतू केंद्रामार्फत देण्यात येणार्या 969 सेवा आणि विविध दाखल्यांपैकी जवळपास सर्व कामे ही आता ग्रामपंचायतची आपलं सरकार पोर्टल मार्फत करण्यात येणार आहेत.
साधारण पुढील महिन्यापासून ग्रामपंचायतमध्ये ही सेवा उपलब्ध होणार असून यासाठी ग्रामपंचायतींचे स्वतंत्र यूजर आयडी काढणीचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची यादी जिल्हा पातळीवरी महाआयटी विभागाला देण्यात आलेली आहे. त्यानूसार ग्रामपंचायतींचे नवीन युजर आयडी काढण्याचे काम सुरू आहे. पुढील आठ दिवसात याबाबत राज्य स्तरावरील महाआयटीकडून मंजुरी मिळाल्यावर पुढील कार्यवाही होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींना महाआयटी विभागाकडून नव्याने युजर आयडी मिळणार असल्याने जुन्या ऑपरेटच्या नावाने दिलेल्या युजर आयडीचे काय करायचे असा प्रश्न असून त्याबाबत निर्णय स्पष्ट नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
निरंतर सेवा
यापूर्वी ग्रामपंचायतीला दिलेले आपलं सेवा केंद्राचे युजर आयडी हे खाजगी ऑपरेटरच्या नावाने होते. या ऑपरेटरांनी काम बंद केले अथवा नोकरी सोडल्यानंतर ग्रामपंचायतीच्या आपलं सरकार केंद्राची अडचण होते. काही ठिकाणी तर ग्रामपंचायतमध्ये नेमलेले ऑपरेटर हे ग्रामपंचायतीसाठी दिलेल्या युजर आयडीतून खाजगी सेवा देत दाखले वितरीत करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. मात्र, आता प्रत्येक ग्रामपंचायतीच्या नावाने युजर आयडी मिळणार असल्याने खाजगी ऑपरेटरांचा हस्तक्षेप थांबणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामसेवक पदाच्या नावाने नव्याने स्वतंत्र मोबाईल नंबर देण्याचा ग्रामपंचायत विभागाचा विचार आहे. यामुळे संबंधित ग्रामसेवकाची बदली झाल्यानंतर देखील हा नंबर ग्रामपंचायतीकडे राहणार आहे. संबंधीत अधिकारी, कर्मचार्यांची बदली झाल्यानंतर देखील नव्याने येणार्या व्यक्तीकडे जुना नंबर कायम राहत असल्याने नागरिकांच्यादृष्टीने ते सोयीचे आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत पातळीवर असणार्या आपलं सरकार सेवा केंद्रासाठी नव्याने युजर आयडी काढण्याचे काम सुरू आहे.
- – दादासाहेब गुंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)
एकाच छताखाली 38 सुविधा
ग्रामपंचायत पातळीवर नव्याने सुरू होणार्या आपलं सरकार केंद्रातून तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणार्या आपल सरकार कक्षामधून ही सेवा देण्यात येणार असून यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना खासगी महा-ई-सेवा केंद्र, सेतू सेंटरमधून मिळणार सेवा आता एकाच ठिकाणी शासकीय विभागाच्या 38 शासकीय विभागाच्या सेवा उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाागाच्यावतीने सांगण्यात आले.