अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांशी 100 दिवस विशेष कार्यक्रमात जिल्ह्यात ग्रामपंचायत पातळीवर राबवण्यात येणार्या उपक्रमाची शंभर टक्के अंमलबजावणी सुरू आहे, की नाही याची तालुकास्तरावर विस्तार अधिकारी ग्रामपंचायत यांच्या वतीने क्रॉस तपासणी करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा ग्रामपंचायत विभागाने काढले असून या तपासणीचा अहवाल 10 मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश म्हटले आहे. जिल्ह्यात गेल्या 60 दिवसांपासून मुख्यमंत्री शंभर दिवस विशेष कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम सर्व शासकीय विभागांना लागू असून यात ग्रामपंचायतींना देखील सहभागी करण्यात आलेले आहे. राज्य पातळीवरून मुख्यमंत्री शंभर दिवस विशेष कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने दर आठवड्याला प्रशासकीय बैठका घेऊन आढावा घेण्यात येत आहे. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील राज्यातील सर्व शासकीय विभागाच्या अधिकार्यांची ऑनलाईन बैठक आढावा घेतलेला आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार्या या विशेष 100 दिवस कार्यक्रमाच्या फलश्रुतीची तपासणी राज्य पातळीवरून त्रयस्थ यंत्रणांकडून करण्यात येणार आहे. यामुळे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला महत्त्व आले आहे. यामुळेच जिल्हा परिषदच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील 1 हजार 300 ग्रामपंचायतमध्ये राबविण्यात असलेल्या या सात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची 4 ते 7 मार्चदरम्यान तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना भेटी घेऊन त्या ठिकाणी सुरू असणार्या कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी यांच्या मार्फत अन्य तालुक्यातील ग्रामपंचायतची तपासणी करण्यात येणार आहे.
अशी होणार क्रॉस तपासणी
अकोल्यातील विस्तार अधिकारी संगमनेर, संगमनेरचे विस्तार अधिकारी अकोले, कोपरगावचे विस्तार अधिकारी राहाता तालुक्यात, राहत्याचे विस्तार अधिकारी कोपरगावमध्ये, श्रीरामपूरचे विस्तार अधिकारी राहुरीत, राहुरीचे विस्तार अधिकारी श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायती तपासणार आहेत. तसेच नेवासा तालुक्यातील विस्तार अधिकारी शेवगाव, शेवगाव तालुक्यातील विस्तार अधिकारी नेवासा, पाथर्डी तालुक्यातील विस्तार अधिकारी श्रीगोंदा तालुका, जामखेड तालुक्यातील विस्तार अधिकारी कर्जत, श्रीगोंदा तालुक्यातील विस्तारधिकारी पाथर्डी, कर्जत तालुक्यातील विस्तारधिकारी जामखेड तालुक्यात, पारनेर तालुक्यातील विस्तार अधिकारी नगर तालुक्यात आणि नगर तालुक्यातील विस्तार अधिकारी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायती तपासणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा परिषद पातळीवरून 28 फेब्रुवारीला काढण्यात आली आहेत.
सहायक नोडल अधिकार्यांनी स्वतंत्र जबाबदारी
ग्रामपंचायत तपासणारे विस्तार अधिकार्यांनी त्यांच्या क्षेत्रभेटीचे फोटो त्याच दिवशीच संबंधित तालुक्याच्या ग्रामपंचायत विभागाच्या व्हाट्सअप ग्रुपवर टाकावेत. तसेच याकामी नेमण्यात आलेल्या सहाय्यक नोडल अधिकारी यांनी संबंधित विस्तार अधिकारी यांनी प्रत्यक्षात नेमलेल्या ग्रामपंचायतीला भेटी दिल्या की नाहीत, याची पडताळणी करण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी दिले आहेत.