अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या कालावधीत इच्छुकांच्या अर्जाचा पाऊस पडला होता. दरम्यान, दाखल अर्ज मागे घेण्यासाठी आज बुधवार (दि.25) अखेरची मुदत असून दुपारी तिननंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 194 ग्रामपंचायतींच्या 1 हजार 701 जागांसाठी 7 हजार 260 अर्ज दाखल असून कोण कोणासाठी माघार घेणार, तर कोण निवडणूक लढणार हे स्पष्ट होणार आहे.
मोठ्या कालावधीनंतर जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून 20 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक असणार्या गावातील नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. दरम्यान, निवडणुका होणार्या 194 ग्रामपंचायतींमध्ये जनतेमधून सरपंच निवड होणार असल्याने सरपंचपदासाठी व सदस्यपदासाठी असे दोनदा मतदारांना मतदान करावे लागणार आहे. 194 ग्रामपंचायतीत 17 हजार 1 सदस्य आहेत. या सदस्यपदासाठी जिल्ह्यात 7 हजार 260 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
याशिवाय सरपंचपदाच्या 194 जागांसाठी 1 हजार 311 जणांनी अर्ज केले आहेत. अर्ज भरण्यासाठी 16 ते 20 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरूवातीच्या दोन दिवसांत उमेदवारांचा उत्साह नव्हता. मात्र, शेवटच्या दोन दिवसांत सदस्य आणि सरपंच पदासाठी विक्रमी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, दाखल अर्जांची छाननी 23 ऑक्टोबरला झाली. यातील अपूर्ण असणारे अर्ज बाद करण्यात आले असून त्याची एकत्रित माहिती आज जिल्हा निवडणूक विभाग देणार आहे. तसेच आज दुपारी माघारीनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे.
त्यानंतर 5 नोव्हेंबरला मतदान व 6 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे. गेल्या काही वर्षापासून पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतीला मोठा निधी येत असल्याने सर्वच पक्षांमध्ये ग्रामपंचायती मिळवण्यासाठी वर्चस्वाची लढाई सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दीड वर्षांपासून लांबणीवर पडल्याने यातील अनेक इच्छूक आता ग्रामपंचायतीला नशीब आजमावून पाहत आहेत. शिवाय पुढील काही महिन्यांत लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार असल्याने गावपातळीवर सरपंच व सदस्यांना मोठे महत्व प्राप्त होणार आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीत एन्ट्री करण्यासाठी इच्छूक सरसावले आहेत. यात अनेक ठिकाणी एकाच नेत्याचे कार्यकर्ते आमने-सामने आहेत. यात कोण बाजी मारणार यावरही राजकीय पक्षांना पुढील निवडणुकीचे गणित मांडण्यास सोयीचे होणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकांना महत्व आले आहे.
काहींची दिवाळी तर काहींचे दिवाळे
निवडणूक म्हटली की उमेदवारांचे दिवाळे आणि मतदारांसह कार्यकर्त्यांची दिवाळी असे काहीसे चित्र असते. यंदा तर निवडणूक काळात दसरा आणि त्यापाठोपाठ दिवाळी सण येत आहे. यामुळे निवडणुकीत कोणाचे दिवाळे आणि कोणाची दिवाळी होणार यासाठी मतमोजणीच्या 6 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.