अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 84 ग्रामपंचायतीच्या सदस्य मंडळ आणि वेगवेगळ्या कारणामुळे रिक्त असणार्या 155 सदस्यांच्या जागांसाठी पुढील महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभेआधीच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बिगूल वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासाठी तयारी सुरू केली असून आज मंगळवारी (दि.9) प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर 19 जुलैला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार असून त्यानंतर निवडणूक आयोग कधीही याठिकाणी निवडणूक घोषित करू शकणार आहे.
दरम्यान, जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत मुदत संपणार्या, नवनिर्मित, मागील निवडणुकीत चुकीची प्रभागरचना झालेल्या, तसेच बहिष्कार व अन्य कारणामुळे निवडणूका न होवू शकलेल्या राज्यातील सुमारे 1 हजार 588 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी, तसेच सदस्य अथवा थेट सरपंच यांच्या रिक्त असणार्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वापरलेली विधानसभेची मतदारयादी वापरण्याच्या सुचना राज्य निवडणूक आयोगाने काढल्या आहेत. त्यानूसार नगर जिल्ह्यात 84 ग्रामपंचायती आणि 155 ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर 15 जुलैपर्यंत त्यावर हरकती घेण्यास मुदत असून 19 तारखेला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदार यादी अंतिम झाल्यावर कधीही निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता जिल्हा निवडणूक विभागाने व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील 155 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा जानेवारीपासून रिक्त आहेत. यामध्ये काही निधन तर काही राजीनामा दिलेल्या सदस्यांचा समावेश आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक 69 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यानंतर शेवगाव 19, संगमनेर 14 आणि नेवासा तालुक्यातील 10 सदस्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात मागील साडेचार महिन्यांपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. 16 मार्च ते 6 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होती. त्यानंतर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 6 जुलैपर्यंत आचारसंहिता लागू होती. दरम्यान, ही आचारसंहिता सुरू असतानाच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याचा अंदाज होता.
मात्र, अचानक राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपणार्या ग्रामपंचायती आणि रिक्त असणर्या सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्व तयारी सुरू केल्याने जिल्ह्यात 84 ग्रामपंचायतमध्ये विधानसभे आधी ग्रामपंचायत निवडणूका होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. यामध्ये नेवासा तालुक्यातील 26, कर्जत 17, अकोले 8, नगर 7, संगमनेर 2, कोपगाव 3, राहाता 1, श्रीरामपूर 2, राहुरी 3, शेवगाव 5, पाथर्डी 4, जाखमेड 3, श्रीगोंदा 1 आणि पारनेर 1 यांचा समावेश आहे.
- 84 ग्रामपंचायत आणि 155 सदस्य पदांसाठी आज प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी
– - 19 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
मुदत संपलेल्या ग्रामपंचायत आणि कंसात सदस्य संख्या
अकोले 8 (69 सदस्य), संगमनेर 2 (14 सदस्य), कोपरगाव 3 (7 सदस्य), राहाता 1 (3 सदस्य), श्रीरामपूर 2 (7 सदस्य), राहुरी 3 (6 सदस्य), नेवासा 26 (10 सदस्य), शेवगाव 6 (19 सदस्य), पाथर्डी 4 (6 सदस्य), जामखेड 3 (सदस्य 5) श्रीगोंदा 1 (4 सदस्य), कर्जत 8 (3 सदस्य), पारनेर 1 (6 सदस्य) आणि नगर 7 (6 सदस्य) एकूण 84 ग्रामपंचायत आणि 155 सदस्य यांचा समावेश आहे.