Saturday, July 27, 2024
Homeनगरविक्रमी अर्जांमुळे गावनेते संकटात

विक्रमी अर्जांमुळे गावनेते संकटात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान होत आहे. मात्र, या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसात उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. सदस्य व सरपंचपदाच्या एकूण जागांच्या तुलनेत चार ते पाचपट अर्ज दाखल झाले आहेत. आता या इच्छूकांमधून अर्ज माघारी घेण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाल्याने सर्वांची डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून मागील आठवड्यात शुक्रवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाले. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये जनतेमधून सरपंच निवड होणार असल्याने सरपंचपदासाठी व सदस्यपदासाठी असे दोनदा मतदारांना मतदान करावे लागणार आहे. 194 ग्रामपंचायतीत 17 हजार 1 सदस्य आहेत. या सदस्यपदासाठी जिल्ह्यात 7 हजार 260 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. याशिवाय सरपंचपदाच्या 194 जागांसाठी 1 हजार 311 जणांनी अर्ज केले आहेत. अर्ज भरण्यासाठी 16 ते 20 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरूवातीच्या दोन दिवसांत उमेदवारांचा उत्साह नव्हता.

मात्र, गुरूवारी आणि शुक्रवारी सदस्य आणि सरपंच पदासाठी विक्रमी अर्ज दाखल झाले असल्याने आता माघारीसाठी नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान, दाखल अर्जांची छानणी 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यात काही अर्ज कमी होतील. 25 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. 5 नोव्हेंबरला मतदान व 6 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. गेल्या काही वर्षांपासून पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतीला मोठा निधी येत असल्याने सर्वच पक्षांमध्ये ग्रामपंचायती मिळवण्यासाठी वर्चस्वाची लढाई सुरू आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दीड वर्षांपासून लांबणीवर पडल्याने यातील अनेक इच्छूक आता ग्रामपंचायतीला नशीब आजमावून पाहत आहेत. शिवाय पुढील काही महिन्यांत लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार असल्याने गावपातळीवर सरपंच व सदस्यांना मोठे महत्व प्राप्त होणार आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीत एन्ट्री करण्यासाठी इच्छूक सरसावले आहेत. यात अनेक ठिकाणी एकाच नेत्याचे कार्यकर्ते आमने-सामने आहेत. त्यांची समजूत घालताना नेत्यांची मात्र दमछाक होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीत कोण बाजी मारणार यावरही राजकीय पक्षांना पुढील निवडणुकीचे गणित मांडण्यास सोयीचे होणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकांना महत्व आले आहे.

दीड वर्षपासून राजकीय बेरोजगारी

जिल्ह्यात स्थानिक निवडणूक म्हणून ओळख असणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक झालेल्या नाहीत. या दोन्ही महत्वाच्या संस्थांमध्ये प्रभारी राज असल्याने दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील नेते आणि प्रमुख कार्यकर्ते एका प्रकारे राजकीय बरोजगार झालेले आहेत. या शिवाय ग्रामपंचायत निवडणूका देखील लेट झालेल्या आहेत. नगर परिषद आणि नगर पालिका निवडणूका ओबीसी आरक्षणामुळे स्थगित झालेल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागात सध्या होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीला महत्व आले आहे. त्यातच दसरा आणि दिवाळी सण येत असल्याने अनेकांची दिवाळी या निवडणुकीत साजरी होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या