Saturday, May 17, 2025
Homeनगरग्रामपंचायत निवडणूक : उमेदवारी अर्जांची इच्छा सर्व्हरमुळे ‘डाऊन’

ग्रामपंचायत निवडणूक : उमेदवारी अर्जांची इच्छा सर्व्हरमुळे ‘डाऊन’

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

सोमवारपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ बंद पडल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी कोपरगावसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारावेत व त्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून परवानगी घ्यावी, अशी मागणी भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदांच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 3 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेला आहे. या निवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. कोपरगाव तालुक्यातील कुंभारी, घोयेगाव, ब्राह्मणगाव, वारी, कान्हेगाव, जवळके, धोत्रे, बोलकी, सुरेगाव, लौकी, मुर्शतपूर, चांदगव्हाण, दहेगाव बोलका, कारवाडी, पोहेगाव, शहाजापूर, मंजूर या 17 तर मतदारसंघात समावेश असलेल्या राहाता तालुक्यातील वाकडी, धनगरवाडी, चितळी, पुणतांबा-रस्तापूर या 4 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा कालावधी 16 ते 20 ऑक्टोबर 2023 असा असून, राज्यभरात आज (16 ऑक्टोबर) पासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता आले नाही. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली असताना निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने एकच गोंधळ उडाला.

दिवसभर सर्व्हर डाऊन झाल्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह नगर जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची बरीच खटपट केली, पण तरीही वेबसाईट बंद असल्याने त्यांना अर्ज न भरताच परत जावे लागले. सर्व्हर डाऊन झाल्याने उमेदवारी अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत.

ऑफलाईन अर्ज स्वीकारा – कोल्हे

निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ असेच बंद राहिले किंवा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. परिणामी ते निवडणूक लढण्याच्या अधिकारापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी उमेदवारांना द्यावी. त्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी ताबडतोब तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याबाबत आयोगाकडून मान्यता घ्यावी, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : दोन लाखासाठी विवाहितेची हत्या

0
गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi नेवासा (Newasa) तालुक्यातील माका येथे एका विवाहित महिलेचा गळा आवळून खून (Married Woman Murder) झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी...