अहमदनगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. 5) मतदान होणार आहे. गावागावात उडालेल्या राजकीय प्रचाराच्या धुराळ्याची सांगता काल (शुक्रवारी) सायंकाळी झाली. दरम्यान, निवडणूक विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून मतदानासाठी एकूण 732 मतदान केंद्र असून तेथे प्रत्येकी 1 अधिकारी व 4 कर्मचारी असे एकूण सुमारे चार हजार कर्मचारी मतदानासाठी तैनात केले जाणार आहे.
जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या 1 हजार 701 जागांसाठी 7 हजार 260 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर प्रत्यक्षात 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर सरपंच पदाच्या 194 जागांसाठी 1 हजार 311 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर 610 उमेदवार रिंगणात आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पद तर काही ठिकाणी सरपंच पदाची जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे 178 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी 6 लाख 34 हजार 321 मतदार मतदान करतील. रविवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळात मतदान होईल. सोमवारी (दि. 6) मतमोजणी होईल. मतदानासाठी एकूण 732 मतदान केंद्र आहे.
मतदानासाठी सदस्यांच्या जागांची संख्या 2034 आहे. यातील 24 जागांसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही तर 313 जागांवर एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. सर्व सदस्यांच्या जागा बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या 19 आहे. माघारीनंतर एकमेव अर्ज राहिलेल्या जागांची संख्या 3 आहे. सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध झालेल्या सरपंचाची संख्या 19 आहे.
तालुकानिहाय मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे- अकोले 22, संगमनेर 6, कोपरगाव 17, श्रीरामपूर 13, राहता 12, राहुरी 21, नेवासे 16, नगर 6, पारनेर 7 पाथर्डी 14, शेवगाव 27, कर्जत 6, जामखेड 3 व श्रीगोंदा 9.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
ग्रामपंचायत मतदानासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सहा उपअधीक्षक या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेऊन राहणार आहेत. सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाचे 91 अधिकारी बंदोबस्तात असतील. समवेत 982 पुरूष व 178 महिला अंमलदार पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीला 175 होमगार्ड असतील. तसेच एक आरसीपी प्लाटून, एक क्यूआरटी प्लाटून, एक एसआरपीएफ प्लाटून बंदोस्तात राहणार आहे.