Saturday, July 27, 2024
Homeनगरउत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांबरोबरच गावपुढार्‍यांची प्रतिष्ठा पणाला

उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांबरोबरच गावपुढार्‍यांची प्रतिष्ठा पणाला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

3 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या नगर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 194 ग्रामपंचायतींच्या तसेच 82 ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुका आज 5 नोव्हेंबर रोजी होत असून अर्ज माघारीच्या दरम्यान यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरीत ग्रामपंचायतींसाठी निवडणूक मतदान प्रक्रिया आज पार पडणार असून प्रत्येक तालुक्यातील पुढार्‍यांच्या गटांबरोबरच स्थानिक गावपुढार्‍यांची ताकदही या निवडणुकीतून दिसून येणार आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात जाहीर झालेल्या 194 पैकी 119 ग्रामपंचायती या उत्तर नगर जिल्ह्यातील आहेत. सरपंचपद हे थेट जनतेतून असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उत्तरेतील 119 ग्रामपंचायतींपैकी 14 सरपंचांची पदे बिनविरोध निवडून आलेली आहेत तर सदस्यांच्या 272 जागाही बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे उत्तरेतील 7 तालुक्यांमध्ये 105 सरपंचांसाठी आज रविवारी मतदान होत आहे. काही ठिकाणी अटीतटीच्या सरळ लढती तर काही ठिकाणी तिरंगी व बहुरंगी लढतीही होत आहेत.

राहुरीच्या 22 ग्रामपंचायतींसाठी जाहीर निवडणुकीत एका ग्रामपंचायतीचा सरपंच तसेच सदस्यांच्या 27 जागा बिनविरोध निवडून आलेल्या असल्याने सदस्यपदासाठी 520 तर 21 सरपंचपदासाठी 68 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहेत. तालुक्यातील पोटनिवडणुकांच्या तिन्ही जागाही बिनविरोध निवडून आल्या असल्याने एकूण 30 सदस्य बिनविरोध आले आहेत. तालुक्यातील पिंप्री वळण ग्रामपंचायत सरपंचपदासह बिनविरोध निवडून आलेली आहे.

राहुरी तालुक्यात बारागावनांदूर, टाकळीमिया, डिग्रस व ब्राम्हणी या मोठ्या प्रमुख ग्रामपंचायतींसाठी या निवडणुकीत मतदान होत आहे. तालुक्यात आमदार तनपुरे गट व ना. विखे-कर्डिले गट अशी अनेक ठिकाणी लढत आहे तर स्थानिक आघाड्याही अनेक ठिकाणी लढतीत आहेत. टाकळीमिया ग्रामपंचायतीत विखे-कर्डिले गट तसेच विरोधी तनपुरे गट या दोन्ही गटांमध्येच दोन-दोन गट वेगळे झाले असून त्यातील गटांचे एकमेकांना झालेले ‘सहकार्य’ही चर्चेत आहे. तालुक्यातील राहुरी खुर्द, पाथरे व गुंजाळे येथील प्रत्येकी एका जागेची पोटनिवडणूक होती. या तिनही जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तालुक्यातील शिलेगाव ग्रामपंचायतीत 7 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने सरपंचपद व दोन सदस्यांसाठी निवडणूक होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील निवडणूक जाहीर झालेल्या 17 पैकी एका ग्रामपंचायतचा सरपंच तसेच 19 जागा बिनविरोध निवडून आलेल्या असून सदस्यांसाठी 405 तर 16 सरपंचांसाठी 48 उमेदवार रिंगणात आहेत.

कोपरगाव तालुक्यात बहुसंख्य ग्रामपंचायतीत कोल्हे-काळे गटात लढती होत आहेत. काही ग्रामपंचायती मात्र अपवाद आहेत. पोहेगाव ग्रामपंचायतीत औताडे-कोल्हे गटाची युती झाली असून या युतीची लढत काळे गटाशी होत आहे. जवळके ग्रामपंचायतीतत जवरे-कोल्हे गटांची युती झाली असून त्यांची लढत काये गटाशी होत आहे. वारी ग्रामपंचायतीत काळे-कोल्हे गटात लढत होत आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींपैकी भैरवनाथनगर, रामपूर, जाफ्राबाद व गुजरवाडी या चार ग्रामपंचायती सरपंच व सदस्यांसह पूर्णपणे बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात केवळ 13 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. एकूण 41 सदस्य बिनविरोध निवडून आलेले असून सदस्यांसाठी 338 जणांचे तर 13 सरपंचपदांसाठी 36 जणांचे राजकीय भवितव्य आज मतदार निश्चित करणार आहेत. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीत भोकरला मुरकुटे-ससाणे विरुद्ध कानडे-ससाणे विखे गटात दुरंगी लढत होत आहे. माळवाडगाव येथे सत्ताधारी बाबासाहेब चिडे व गिरीधर आसने युतीविरोधात डॉ. नितीन आसने गट असा दुरंगी सामना होत आहे.

नेवासा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी सरपंचपदाचा एकही उमेदवार बिनविरोध निवडून आला नाही. मात्र भानसहिवरा ग्रामपंचायतीचे सर्व 15 सदस्य तसेच खुणेगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. मोठ्या ग्रामपंचायतीत देडगावात सरपंचपदासाठी तब्बल 9 उमेदवारांमध्ये लक्षवेधी लढत होत आहे. पाचेगाव ग्रामपंचायतीत दुरंगी लढत होत आहे. तालुक्यातील एकूण सदस्यांच्या 43 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत तर 16 सरपंचांसाठी 50 उमेदवार नशिब अजमावत आहेत. सदस्यांसाठी 262 उमेदवार रिंगणात आहेत.

तालुक्यात माजी आमदार शंकरराव गडाख यांना मानणार्‍या दोन गटांमध्येच अनेक ठिकाणी लढती होत आहेत. कोणता गट प्रबळ आहे हे या निवडणुकीतून दाखवून देण्याची संधी गावपातळीवरील पुढार्‍यांना मिळणार आहे. भानसहिवरा ग्रामपंचायतीत सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. मुकिंदपूर ग्रामपंचायतीत चुरशीची लढत होणार आहे. देडगाव ग्रामपंचायतीत सरपंपदासाठी 9 जणांमध्ये लढत आहे तर प्रत्येक प्रभागात येथे बहुरंगी लढती आहेत.

राहाता तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींमध्ये सर्व 12 ठिकाणी सरपंचपदासाठीही लढत होत असून 51 उमेदवार त्यासाठी रिंगणात आहेत. तालुक्यातील एकूण 10 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आलेले असून आता 373 उमेदवार रिंगणात आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये दुर्गापूर ग्रामपंचायतीचे 9 तर दहेगाव ग्रामपंचायतीच्या एका सदस्याचा समावेश आहे.

राहाता तालुक्यातील पुणतांबा ग्रामपंचायतीत कोल्हे, विखे व काळे या गटांमध्ये तिरंगी लढतीने तालुक्याचे लक्ष वेधले आहे. चितळीतही विखे गट, काळे गट व कोल्हे गट असा तिरंगी सामना आहे. वाकडीत विखे गटामध्येच दोन गट पडले असून एक गट काळे गटाबरोबर गेला असून त्यांची लढत कोल्हे गटाशी होत आहे.

अकोले तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. पैकी 6 पूर्णपाणे बिनविरोध झाल्या आहेत. यात 114 सदस्य व 6 सरपंचांचा समावेश आहे. सदस्यांसाठी 361 तर सरपंचपदासाठी 78 उमेदवार रिंगणात आहेत. खानापूर-आगार, पेढेवाडी, कोकणवाडी, कौठवाडी, देवगाव व आंबेवंगण या बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायती आहेत. अकोले तालुक्यात स्थानिक व तालुकास्तरीय पुढार्‍यांना मानणारे गट निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्याच रिंगणात आहेत.

या निवडणुकीत संगमनेर तालुक्यातून केवळ 7 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील ढोलेवाडी व बोरबन या दोन ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. ढोलेवाडीच्या एका सदस्यासाठी निवडणूक होणार आहे. 5 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 13 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 18 सदस्य बिनविरोध निवडून आलेले असून सदस्यांसाठी 132 उमेदवार रिंगणात आहेत.

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीत थोरात गटाचेच दोन गट आमने सामने आहेत. आश्वी खुर्दमध्ये थोरात-विखे गटामध्ये अटीतटीची लढत होणार आहे. निवडणूक होत असलेल्या अन्य ग्रामपंचायतीत आश्वी बुद्रुक, पिंपळगाव कोंझिरा व घारगाव या गावांचा समावेश आहे.

अशाप्रकारे उत्तर नगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर, नेवासा, राहाता, राहुरी, अकोले, संगमनेर, कोपरगाव या निवडणूक होत असलेल्या 7 तालुक्यातील 119 ग्रामपंचायतींपैकी 14 सरपंच बिनविरोध निवडून आले असल्याने 105 सरपंचांसाठी आज निवडणूक होत आहे. तर 272 सदस्य बिनविरोध आलेले असल्याने उर्वरीत सदस्यांसाठीही आज मतदान होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या