Friday, May 31, 2024
Homeनगरग्रामपंचायत निवडणूक : शेवटच्या दिवशी उक्कलगावकरांची धावाधाव

ग्रामपंचायत निवडणूक : शेवटच्या दिवशी उक्कलगावकरांची धावाधाव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या सजग आणि प्रतिष्ठेच्या उक्कलगाव ग्रामपंचायतीची निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होत असून शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांची धांदल उडाल्याचे बघावयास मिळाले.

- Advertisement -

तहसील कचेरीच्या निवडणूक शाखेत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व संभाव्य उमेदवार आपला प्रतिस्पर्धी कोण? याचा तर्क लावत होते. काहीजण बाजुला जाऊन आपसात गंभीर चर्चा करताना दिसत होते. तर काहीजण अगदी शेवटच्या मिनिटांपर्यंत कागदपत्रांसाठी धावपळ करताना दिसत होते. 16 तारखेपासून अर्ज दाखल करायला सुरुवात होऊनही नेते व कार्यकर्ते गावकी व भावकीचा वाद मिटवण्यात व्यस्त होते. परिणामी उमेदवार शोधताना कसरत करावी लागत होती. मात्र अवधी थोडा असल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय झाल्याने एका गटाची प्रचंड तारांबळ उडाल्याचे बघायला मिळाले. दोन्ही मंडळांनी काही ठिकाणी एकच उमेदवार देऊन उमेदवारीबाबतची संभ्रमावस्था निर्माण केली आहे.

दोन्ही मंडळांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी सर्वसाधारण जागेवरून एका मंडळात पुन्हा ताणाताणी झाल्याची कुजबुज गावात कुठे दबक्या आवाजात तर कुठे खमंगपणे सुरू होती. त्यामुळे माघारीपर्यंत काही गडबड होतेय का? याचीही अनेकांना उत्सुकता लागून आहे. दरम्यान काही जणांनी अर्ज दाखल केल्यानंतर विजयी मुद्रेत आनंदोत्सव व्यक्त केल्याचेही बघायला मिळाले. सुरुवातीला उमेदवारी करायची नाही असे म्हणणार्‍या काही जणांनी अचानक गुडघ्याला बाशिंग बांधल्याने तोही एक चर्चेचा विषय झाला. तिसरी आघाडी हरिहर एकता आघाडीत विलीन झाल्याने ही निवडूण दुरंगी होण्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सरपंचपदासाठी 3 तर सदस्यपदासाठी एका अपक्षासह 53 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. 25 तारखेला माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

दरम्यान वाकण वस्ती परिसरातील नागरिकांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असून ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, बन्सीभाऊ थोरात, बंडेराव तांबे, प्रकाश जगधने, वसंतराव थोरात, आनंदराव थोरात, पुरुषोत्तम थोरात, शरद थोरात यांनी ग्रामस्थांचे समुपदेशन व लोकशाहीतील अधिकाराचे महत्त्व पटवून दिल्याने ग्रामस्थांचे समाधान होऊन वादावर तूर्त पडला आहे. मतदानावर टाकलेला बहिष्कार आम्ही मागे घेत असल्याची ग्वाही यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या