Saturday, July 27, 2024
Homeनगरजिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींसाठी 79 टक्के मतदान

जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींसाठी 79 टक्के मतदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींसाठी काल (रविवारी) उत्साही वातावरणात मतदान झाले. सरपंच पदाच्या 178 जागांसाठी 610 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या 1 हजार 701 जागांसाठी 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदारांमध्ये सकाळपासून मतदानासाठी उत्साह होता. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 67. 16 टक्के मतदान झाले. त्यानंतरही मतदानाचा ओघ कायम राहिला. जिल्ह्यात सायंकाळी साडेपाचपर्यंत सरासरी 79.13 टक्के मतदान झाले. सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. आज (सोमवार) मतमोजणी होणार आहे. राहाता तालुक्यात सर्वात कमी 60.76 टक्के मतदान झाले.

- Advertisement -

दरम्यान, अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची वेळ संपून गेल्यानंतरही मतदारांनी गर्दी केली होती. राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. सरपंच पदाच्या 194 जागांसाठी 1 हजार 311 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर 610 उमेदवार रिंगणात आहे. ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या 1 हजार 701 जागांसाठी माघारीनंतर प्रत्यक्षात 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी 16 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित 178 ग्रामपंचायतींसाठी 732 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. साडे चार हजार अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले होते. दीड हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

निवडणूक कर्मचारी हे मतदान केंद्रांवर शनिवारी रात्रीच मुक्कामी पोहचले होते. रविवारी सकाळी साडे सात वाजताच मतदानाला प्रारंभ झाला. उमेदवार, त्यांच्या कुटुंबियांनी प्रारंभीच मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतरही मतदार आपल्या सोईनुसार मतदानासाठी येत होते. नोकरी, कामधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले मतदार दुपारपासून मतदानासाठी येण्यास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतींमधील 3 लाख 47 हजार 893 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्ह्यात सरासरी 79. 13 टक्के मतदान झाले.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या, दुपारी साडे तीन वाजेपर्यंत झालेले मतदान आणि टक्केवारी याप्रमाणे –

अकोले- 21 (16 हजार 31) 79.13, संगमनेर- 6 (16 हजार 700) 79.84, कोपरगाव- 17 (36 हजार 978) 79.21, श्रीरामपूर- 13 (32 हजार 54) 75.15, राहाता- 12 (31 हजार 524) 60.76, राहुरी- 21 (45 हजार 964) 83.31, नेवासा- 16 (30 हजार 394) 81.98, नगर- 6 (15 हजार 641) 81.32, पारनेर- 7 (12 हजार 432) 83.06, पाथर्डी- 14 (18 हजार 185) 83.67, शेवगाव- 27 (46 हजार 599) 82.68, कर्जत- 6 (8 हजार 971) 90.89, जामखेड- 3 (5 हजार 696) 86.37, श्रीगोंदा- 9 (30 हजार 724) 84.76.

– पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे मतदान करून केंद्राबाहेर येताना एका मतदारास हृदयविकाराच्या झ्टका आल्याने मृत्यू.

– दुसर्‍या घटनेत करंजी येथे मतदान करण्यासाठी घरी जाऊन मारहाण केल्याने एका युवकावर गुन्हा दाखल.

– अनेक गावांत मतदानासाठी शेवटी शेवटी मतदारांच्या रांगा

- Advertisment -

ताज्या बातम्या