अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या राज्यातील 1 हजार 673 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच सदस्य अथवा सरपंचाच्या रिक्त जागांवर पोटनिवडणूक घेण्यासाठी पारंपरिक पध्दतीने राबविण्यात येणारा मतदार यादी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात नगर जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायती तर काही ठिकाणी होणार्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी अद्यावत करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सचिव सुरेश काकाणी यांनी हा मतदार यादी कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. यात प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 19 मार्चला प्रसिध्द करण्यात येणार असून या यादीवर 24 मार्चपर्यंत हरकती व सूचना घेण्यात येणार आहे त्यानंतर 26 मार्च रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 99 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणे बाकी आहे. या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना अंतिम करण्यात आलेल्या असून या ठिकाणी गेल्या एका वर्षापासून निवडणुकीची प्रतीक्षा आहे.
गेले अडीच ते तीन वर्षापासून राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, मात्र निवडणुका न झालेल्या ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोग टप्प्याटप्प्याने हालचाली करताना दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून नगरसह राज्यात निवडणुकां न झालेल्या ग्रामपंचायतीचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
2024 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायती आणि कंसात सदस्य पद अकोले 8 (69), संगमनेर 2 (14), कोपरगाव 3 (7), राहाता 1 (3), श्रीरामपूर 2 (7), राहुरी 3 (6), नेवासा 26 (10), शेवगाव 6 (19), पाथर्डी 4 (6), जामखेड 3 (5) श्रीगोंदा 1 (4), कर्जत 8 (3), पारनेर 1 (6) आणि नगर 7 (6) एकूण 84 ग्रामपंचायत आणि 155 सदस्य यांचा समावेश आहे.
2025 मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायती
श्रीगोंदा तालुक्यातील 6, संगमनेर 2, कर्जत 2, पारनेर 2 आणि अकोले तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.