अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कर्जत पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी राजा आटकोरे यांनी महिला ग्रामसेवकाचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. अतिरिक्त ग्रामपंचायतीचा कार्यभार देत असतांना तो घेत नसल्याने यासाठी वेगळे काही तरी द्यावे लागते, असे म्हणत विनयभंग करण्याची घटना घडली आहे. या घटनेने महिला कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पिडित महिला कर्मचारी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हणले आहे, 22 तारखेला पंचायत समिती कर्जत येथे मासिक सभा असल्याने सकाळी 11 वाजता ग्रामसेविका पंचायत समिती कार्यालयामध्ये आल्या होत्या. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पीडित महिला कार्यालयामध्ये गेला. त्यावेळी विस्ताराधिकारी आटकोरे कार्यालयात एकटेच होते. यावेळी पीडित महिलेने मला आणखी एका ग्रामपंचायतचा अतिरिक्त कार्यभार देऊ नका, अशी विनंती केली. यावर आटकोरे यांनी अशी कामे पैशाशिवाय होत नाहीत. परंतू तुमच्याकडून मी वेगळेच काहीतरी घेणार आहे, असे म्हणत विनयभंग केला.
यानंतर हा सर्व प्रकार त्यांनी त्यांची पती यांना सांगितला. यानंतर ग्रामसेविकेच्या पतीने विस्ताराधिकारी आटकोरे यांची चारित्र्याबद्दल चौकशी केली. त्यात आटकोरे अशाच पद्धतीने इतरही महिला कर्मचार्यांशी वर्तन करत असल्याची माहिती समोर आली. यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विस्तार अधिकारी आटकोरे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी याची दखल घेत संबंधित विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलेने केले आहे. दरम्यान या घटनेने कर्जत पंचायत समितीमध्ये खळबळ उडाली असून सर्व महिला कर्मचारी संघटनांच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.