कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत कार्यालयात तू आमच्या वारस हक्काची नोंद का करत नाही, असे म्हणत ग्रामसेवकाला बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकमठाण येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर देवराम सुर्वे (जवळे कडलग, ता. संगमनेर) हे 16 ऑक्टोबर रोजी दुपारी पाचच्या सुमारास कोकमठाण ग्रामपंचायतीत कामकाज करीत होते. तेव्हा महेश विजय गायकवाड, श्रीकांत विजय गायकवाड, विजय गायकवाड व महेश गायकवाड याची आई (सर्व रा. कोकमठाण) तेथे आले. त्यांनी सुर्वे यांना तू आमचे वारस हक्काची नोंद का करत नाहीस, अशी विचारणा केली.
त्यावर ग्रामसेवक सुर्वे म्हणाले, तुम्ही न्यायालयातून कागदपत्रे बनवून आणा, मी तुमची वारसाची प्रॉपर्टीला नोंद लावतो. याचा राग चौघांना आला, त्यांनी सुर्वे यांना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ओढत आणून मारहाण केली. महेश गायकवाड याने दगड सुर्वे यांच्या डोक्यात मारला. तसेच काम न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत ग्रामसवेक सुर्वे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वर सुर्वे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील चार जणांविरूद्ध भा.द. वि. कलम 132, 118 (2), 121 (2),115, 352, 351 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार करीत आहेत.