जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed
जिवंत व्यक्तीला कागदोपत्री मयत दाखवणार्या ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी गेल्या तीन दिवसांपासून जामखेड तहसील कार्यालयात उपोषण सुरु होते. बुधवारी (दि.26) सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दोषी ग्रामसेवक राजेंद्र वळेकर यांच्या निलंबनाचा आदेश काढला. यामुळे तिसर्या दिवशी घरकुल योजनेचे लाभार्थी यांचा मुलगा भागवत भुजंग जायभाय यांनी उपोषण मागे घेतले.
आशिष येरेकर यांनी आदेशात म्हटले आहे, राजेंद्र बन्सीधर वळेकर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत साकत, नान्नज, जायभायवाडी तालुका जामखेड येथे कार्यरत असून त्यांनी कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केलेला आहे. त्यांच्या गैरवर्तनात सुधारणा करण्याची संधी देऊनही सुधारणा झाली नाही. त्यांना जिल्हा परिषद सेवेतून ग्रामपंचयत अधिकारी या पदावरून सेवा निलंबीत करीत आहे.
जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथे प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेतील लाभार्थी भुजंग जायभाय हे जिवंत असूनही ग्रामपंचायतीच्या ठरावात ग्रामसेवक राजेंद्र वळेकर व सरपंचानी मयत दाखवण्याचा प्रताप केला आहे. याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी लाभार्थी यांचा मुलगा भागवत भुजंग जायभाय यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर दि. 24 मार्च रोजी प्रत्यक्ष आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष विनोदसिंग परदेशी व तालुका अध्यक्ष नय्युम सुभेदार यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन उपोषणास पाठिंबा दिला होता. दरम्यान, ग्रामसेवकास निलंबित करण्यात आले असले तरी यातील दोषी सरपंच, ठरावाचे अनुमोदक व सूचक यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी कायदेशीर लढा चालूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्ते व ग्रामस्थांनी सांगितले.