अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अकोले तालुक्यातील समशेरपूर/देवठाण ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र किसन वर्पे यांना सेवेत गैरवर्तन व गैरव्यवहार केल्याप्रकरणी सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. वर्पे यांची विरोधात करण्यात आलेल्या विभागीय चौकशीत ठेवण्यात आलेले सातही दोषारोप सिद्ध झालेली त्यांच्यावर मंगळवार (दि.29) रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी बडतर्फीची कारवाई केली.
ग्रामसेवक वर्पे यांनी समशेरपूर/देवठाण ग्रामपंचायतमध्ये 2017-2018, 2019- 2020 आणि 2020-2021 या वेगवेगळ्या आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांच्या संशयीत अपहार व अनियमितता केलेली आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने नाशिक विभाग पातळीवर चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते हे आरोप सिद्ध झाल्याने त्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या कामात सचोटी व वागणूक कर्तव्यनुसार अधिन न राहता जिल्हा परिषद सेवा वर्तणूक एक नियम 3 चा भंग केला असल्याचे सिध्द झाले आहे. तसेच याप्रकरणी त्यांना सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये ? याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. संबंधित नोटीसला वर्पे यांनी सादर केलेल्या खुलाशात समर्थनीय कारण सादर केलेली नाही. यामुळे त्यांचा खुलासा अमान्य करत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असल्याची आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी काढले आहेत.
या योजनांमध्ये केला अपहार
वर्पे यांनी त्यांच्या कार्यकाळात देवठाण व समशेरपूर ग्रामपंचायतीमध्ये काम करतांना दरपत्रकशिवाय ग्रामनिधीचा खर्च करणे, कोटेशनशिवाय खर्च करणे, पाणी पुरवठा विभागाच्या खर्चात अनियमितता, 14 व्या वित्त आयोगाचा नियमबाह्य खर्च करणे यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च केलेला आहे. यामुळे ग्रामसेवक वर्पे याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ग्रामपंचायतीमध्ये गैरवर्तन व अपहार करणार्यांना चाप बसणार आहे.