Tuesday, September 24, 2024
Homeमुख्य बातम्याशाळांमध्ये 'आजी-आजोबा' दिवस साजरा होणार; राज्य सरकारचा निर्णय

शाळांमध्ये ‘आजी-आजोबा’ दिवस साजरा होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

आजी, आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते. आजी आजोबांच्या या घट्ट नात्याची ओळख नातवांशी होणे हे आजच्या काळात महत्वपूर्ण बनले आहे. पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे नाते गरजेचे आणि प्रेरणादायी आहे. यासाठी राज्य सरकारने दरवर्षीं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येणारा ‘आजी आजोबा’ दिवस (Grandparents’ Day in schools )आता राज्यातील शाळांमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

राज्यात १० सप्टेंबर २०२३ रोजी ‘आजी आजोबा’ दिवस साजरा होईल. या दिवशी राज्यस्तर, जिल्हास्तर आणि शाळास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. त्यांनतर प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करण्यात यावा. या दिवशी शासकीय सुट्टी आल्यास त्याच्या पुढच्या कार्यालयीन दिवशी ह्या दिवसाचे कार्यक्रम घेण्यात यावेत. तसेच, प्रस्तावित दिवशी कार्यक्रम घेता आला नाही तर शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस ‘आजी आजोबा’ दिवस साजरा करावा असा निर्णय सरकारने घेतला आहे.

शाळेतील अनुभव यासह आजी आजोबांचे अनुभव, त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती पाल्यांना मिळणे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ आणि गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख करून देणे, शाळेबरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी ‘आजी आजोबा’ दिवस साजरा होणे आवश्यक आहे, असे या शासन निर्णयात म्हटले आहे.

आजी आजोबांकरिता हे उपक्रम राबविणार. . .

विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करून द्यावा. आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, चित्रकला, नृत्य असे कार्यक्रम आयोजित करावे. विटीदांडू, संगीत खुर्ची असे खेळ ठेऊन बालपणीच्या आठवणी ताज्या करता येतील. आजी आजोबांसोबत शाळेतील शिक्षकांचाही सहभाग असावा पारंपरिक वेशभूषेमध्ये आजी आजोबा यांना बोलवावे. (ऐच्छीक बाब). महिलांसाठी मेहंदी आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करणे. आपल्या लाडक्या आजी आजोबांसाठी विद्यार्थ्यांनीही कलाकृती सादर करावी. आजीच्या बटव्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे. झाडे लावणे व पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या