अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
रविवारी जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळेत 34 हजार 624 असाक्षरांपैकी 32 हजार 495 आजी, आजोबा आणि असाक्षरांनी उल्लास नव साक्षरता अभियानात उत्साहात परीक्षा दिली. यावेळी शिक्षण उपसंचालक हारूण आतार यांनी संगमनेर तालुक्यातील परीक्षा असणार्या शाळांना भेटी देत साक्षरतेची परीक्षा देणार्या आजी- आजोबांशी संवाद साधला.
केंद्र पुरस्कृत उल्लास नवसाक्षरता कार्यक्रमांतर्गत 2022-23 ते 2026-27 या कालावधीत साक्षरता मोहीम राबविली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 2024-25 या वर्षात 34 हजार 624 नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात उल्लास साक्षर अभियान राबवण्यात येत आहे. यात जिल्ह्यात नेमलेल्या स्वयंसेवकांमार्फत 15 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये वाचन, लेखन व संख्याज्ञान विकसित करून त्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करण्यात येत आहे. या कौशल्यामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण या बाबींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील 13 हजार 134 स्वयंसेवकांनी वर्षभर उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे 34 हजार 624 असाक्षरांची नोंदणी केली. या सर्वांची मूल्यमापन चाचणी रविवारी (दि. 23) उत्साहात पार पडली. चाचणीसाठी असाक्षर प्रौढांनी ज्या शाळेतून नोंदणी केली, त्याच शाळांत त्यांचे परीक्षा केंद्र ठवण्यात आले होते. या ठिकाणी संबंधितांची दीडशे गुणांच्या वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या घटकांवर प्रत्येकी 50 गुणांची परीक्षा घेण्यात आली. रविवारी झालेल्या परीक्षेला अकोले 2 हजार 527, जामखेड 1 हजार 157, कोपरगाव 2 हजार 52, कर्जत 1 हजार 440, नगर 2 हजार 578, पारनेर 1 हजार 912, नेवासा 2 हजार 455, पाथर्डी 1 हजार 921, राहुरी 2 हजार 374, राहाता 2 हजार 51, शेवगाव 2 हजार 19, संगमनेर 5 हजार 540, श्रीगोंदा 1 हजार 923, श्रीरामपूर 2 हजार 199, मनपा (नगर शहर) 347 अशा एकूण 32 हजार 495 नागरिकांनी ही परीक्षा दिली.