अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील अंशत: अनुदानित शाळांवरील 52 हजार 276 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी 1 ऑगस्टपासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले आहे. यात नगर जिल्ह्यातील 1 हजार 200 शिक्षकांना अनुदान मिळणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
2024-25 च्या संच मान्यतेनुसार पटसंख्या व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचार्यांची पदे ग्राह्य धरली जाणार आहेत. पटसंख्या कमी झाल्यास पदे कमी करण्यात येणार असून ते अधिकार शिक्षण संचालकांना असणार आहेत. टप्पा अनुदान घेणार्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीत नोंदविली जात असल्याची खात्री करावी. तीन महिन्यांचा डीजीटल रेकॉर्ड बंधनकारक आहे. अट पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, पण अटींचे पालन न करणार्या शाळांचे अनुदान रोखण्याचे अधिकार शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत.
20 टक्क्यांवरील 2 हजार 79 शाळा, 4 हजार 183 तुकड्यांवरील 15 हजार 859 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी 304 कोटींचे अनुदान मिळणार आहे.
40 टक्क्यांवरील 1 हजार 781 शाळा व 2 हजार 561 तुकड्यांवरील 13 हजार 959 शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी 276 कोटी 52 लाख रुपयांचा तर 60 टक्के अनुदानावरील एक हजार 894 शाळा व 2 हजार 192 तुकड्यांवरील 19 हजार 744 शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी 341 कोटी 58 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या तीनही टप्प्यानूसार नगर जिल्ह्यातील 1 हजार 200 शिक्षकांना टप्पा अनुदान मिळणार आहे.
ऑनलाईन कागदपत्रांची माहिती आठ दिवसांत
शालार्थ आयडी व मान्यता बोगस घेऊन शासनाचे वेतन घेणार्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांची कागदपत्रे शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन मागविली आहेत. त्यासाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या अनुषंगाने वेतन अधीक्षकांनी सर्व मुख्याध्यापकांना तसे आदेश काढलेले आहेत. साधारण आठ दिवसात याबाबतची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.





