Thursday, July 9, 2026
HomeनगरNewasa : ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Newasa : ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

माऊलींच्या जयघोषाने नेवासानगरी दुमदुमली

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याचे टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. माऊली… माऊली…च्या अखंड गजराने संपूर्ण नेवासानगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.

- Advertisement -

संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदिराचे निर्माते वै. बन्सी महाराज तांबे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच देविदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे आयोजन करण्यात आले. आळंदीच्या धर्तीवर तयार करण्यात आलेला आकर्षक पालखी रथ नेवासकरांसाठी विशेष आकर्षण ठरला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन पदस्पर्शाने पुन्हा एकदा नेवासानगरीत भक्तिरसाचा जागर अनुभवायला मिळाल्याची भावना वारकरी भाविकांनी व्यक्त केली. पालखी प्रस्थानापूर्वी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांचा अभिषेक व पूजन करण्यात आले. यावेळी गंगापूर येथील श्री विठ्ठल आश्रमाचे रामभाऊ महाराज राऊत, उद्धव महाराज मंडलिक, श्रीराम महाराज झिंजुर्डे, कदम महाराज, गणेश महाराज आरगडे, राम महाराज भोगे, महंत ऋषिकेशनाथ महाराज, हारदे महाराज, राम महाराज बोचरे, भगवान महाराज जंगले यांच्यासह संत ज्ञानेश्वर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचौता हस्ते पालखी रथातील पादुकांचे पूजन करण्यात आले.

आवाहनानुसार असंख्य दिंड्या या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून निघालेली दिंडी शहर परिक्रमेदरम्यान विविध चौकांमध्ये, संस्था, संघटना व नागरिकांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी रांगोळ्या काढून, पंचारती ओवाळून तसेच फटाक्यांची आतषबाजी आणि तोफांच्या सलामीने माऊलींचे स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख चौकांमध्ये स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या.
दिंडीतील पहिला रिंगण सोहळा नेवासा एसटी स्थानकाच्या प्रांगणात पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकर्‍यांसाठी हा पहिला रिंगण सोहळा विशेष आकर्षणाचा ठरला.

रिंगणानंतर पालखी दिंडी नेवासा मार्केट कमिटी मार्गे नेवासाफाटा रोडवरील श्री संत ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे मुक्कामी दाखल झाली. नेवासा खुर्द व नेवासा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आमटी-भाकरीची मानाची पहिली पंगत देण्यात आली. रात्री देविदास महाराज म्हस्के यांचे कीर्तन झाले. यंदाच्या दिंडीत सुमारे 15 हजार वारकरी सहभागी झाले असून पंढरपूरच्या मार्गावर आणखी अनेक दिंड्या सहभागी होणार असल्याने पुढे ही संख्या 30 ते 40 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या अश्व व बैलजोडीची पशुसंवर्धन विभाग, नेवासा यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक औषधांचे वाटपही करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी गुढघे, डॉ. भास्कर गायकवाड तसेच फिरता पशुवैद्यकीय दवाखान्याचे अशोक नागरगोजे, श्री.मगर, श्री. वाल्हेकर व श्री. तांबे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जायकवाडी पुनर्वसित गावांच्या प्रश्नांना अखेर गती

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महसूल आणि जलसंपदा विभागाने एकत्रित सर्व्हेक्षण करून एक महिन्यात प्रस्ताव सादर करण्याचा सूचना जलसंपदा मंत्री...